मुंबई – अश्लिल चित्रपट बनविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उद्योजक राज कुंद्रा प्रकरणावर अभिनेत्री आणि राज याची पत्नी शिल्पा शेट्टीने जाहिर निवेदन प्रसिद्ध केले आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. या संपूर्ण प्रकरणावर तिने प्रथमच मौन सोडत स्पष्ट आणि थेटपणे भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज आणि शिल्पा हे चर्चेत आहेत. तसेच, पोलिसांनीही या दोघांची कसून चौकशी केली आहे. राज सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
शिल्पा शेट्टी म्हणते की,
गेले काही दिवस आमच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. अनेक आरोप झाले. अफवा पसरल्या. माध्यमांनी आणि अनेकांनी माझ्यावर विविध प्रकारची टिपण्णी केली. बरेच ट्रोल करण्यात आले. मला असंख्य प्रश्न विचारण्यात आले. खरे तर मलाच नाही तर माझे संपूर्ण कुटुंब यातून जात आहे. यासंदर्भात मी अद्याप काहीच बोलले नाही. हे प्रकरण न्यायालयीन आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करणे आणि माझ्यावतीने खोटे कोट देणे थांबवा. कधीही तक्रार करु नका, कधीही खुलासा करु नका या तत्वानुसार एक सेलिब्रेटी म्हणून मी ते पाळेन. मला मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा दृढ विश्वास आहे.
एक कुटुंब म्हणून, आम्ही आमच्या सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत, करणार आहोत. पण, माझी नम्र विनंती आहे की, विशेषत: मी एक आई असल्याने माझ्या मुलांच्या भविष्याचा विचार करा. आमच्या गोपनीयतेचा आदर करा. पुन्हा विनंती करते की, सत्य जाणून घेतल्याशिवाय अर्धवट माहितीच्या आधारे वक्तव्य करु नका. त्यापासून दूर राहा.
मी कायद्याचे पालन करते. आणि तसे करणारी एक भारतीय नागरिक आहे. गेल्या २९ वर्षांपासून मी कठोर मेहनत करीत आहे. चाहते, नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी कुणालाही निराश केलेले नाही.
महत्त्वाचे म्हणजे, मी परत एकदा विनंती करते की, या कठीण काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करावा. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपया कायद्याला मार्ग दाखवू द्या आणि त्यांचे काम करु द्या. सत्यमेव जयते!
– शिल्पा शेट्टी कुंद्रा