मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. एनसीपीएच्या टाटा थिएटर मध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील १११ गुणवंत शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार ज.मो.अभ्यंकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, मनीषा कायंदे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
‘शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिक्षक केवळ पुस्तकातील धडा शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. आत्मविश्वास, संस्कार आणि प्रामाणिकपणाची बीजे त्यांच्या मनात पेरतात. शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कार वितरणाच्यावेळी दिलेल्या व्हीडिओ संदेशात केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोविड काळात शिक्षकांनी दाखवलेले समर्पण कौतुकास्पद होते. मोबाईल, लॅपटॉप, ऑनलाईन क्लासेस, व्हॉट्सअॅप ग्रुप्स अशा साधनांचा वापर करून शिक्षण अखंड सुरू ठेवणाऱ्या शिक्षकांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. राज्यात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडवण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. अलीकडेच राज्य शासन आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड ॲसेसमेंट इंडिया यांच्यात सामंजस्य करार झाला असून, त्याद्वारे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण कार्यक्रम, डिजिटल साक्षरता, हवामान शिक्षण, जीवन कौशल्ये व मूल्य शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम राज्यातील शाळांमध्ये राबविले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ग्रामीण तसेच शहरी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अध्यापन पद्धतींचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार असून, शिक्षकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण होणार आहे. राज्याची शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि जागतिक मानकांशी अनुरूप करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात आहेत. यात शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज यावेळी अधोरेखित केली. पूर्वी साक्षर-अनाक्षर यावर भर होता, नंतर संगणक साक्षरतेचा काळ आला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग आहे. यामुळे प्रत्येकाने एआय साक्षर होणे, डिजिटल शिक्षण पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेल्या शिक्षकांचे कौतुक करुन अधिकाधिक संख्येने शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवावा, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळा आता कात टाकत असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. शासनाने मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. शिक्षक पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा कृतज्ञतेने उल्लेख करुन भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनाच्या दिवशीच (5 सप्टेंबर) पुरस्कार वितरण व्हावे, अशी सूचना त्यांनी शिक्षण विभागाला केली.
देशाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान – ॲड.राहुल नार्वेकर
भारत हा युवकांचा देश आहे. भारताला कौशल्ययुक्त युवकांचा देश बनवले तर एकही देश भारतीय मनुष्यबळाशिवाय काम करू शकणार नाही आणि जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून भारत पुढे येईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केले. भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल आणि देशांच्या या प्रगतीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा शासनाचा संकल्प – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांच्या कार्यगाथा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. कोविडसारख्या कठीण काळात जग थांबले, पण शिक्षकांनी शिक्षण थांबू दिले नाही. ज्ञानदानाची अखंड धारा सुरू ठेवत त्यांनी समाजाला प्रेरणा दिली, अशा शब्दात त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ असल्याचे नमूद करत, सावित्रीमाई फुले यांच्या कार्यामुळेच स्त्रीशिक्षणाची दारे उघडली आणि शिक्षणाचा प्रवास पुढे सरसावला, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे शिक्षकवृत्तीतील त्याग, कष्ट आणि समर्पणाचा उत्सव आहे. राज्य शासन शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून शाळांची पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षणाला चालना, शिक्षक प्रशिक्षण, आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत समान संधी पोहोचवणे या बाबींवर शासन सातत्याने काम करीत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा शासनाचा संकल्प असून पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी घडवलेली पिढीच उद्याचा महाराष्ट्र व भारत उज्ज्वल करेल, असे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
पुढील वर्षापासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी जाहीर केले.
शब्द घडवतो विचार, विचार घडवतो माणूस आणि माणूस घडवतो देश. या प्रवासाची सुरुवात शिक्षकांकडून होते आणि म्हणूनच शिक्षक हे समाज व राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. शाळा बदलते पण त्यासाठी एक जिद्दी शिक्षक लागतो अशा शब्दात मंत्री श्री. भुसे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, शिक्षकांचा प्रवास हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच नाही तर समाजाच्या जडणघडणीसाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञांची भूमी असून त्यांच्या कार्यातून समाजात परिवर्तन घडले. आजचे शिक्षक या परंपरेचे वारस आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे. वारे गुरुजी, केशव गावित सर, दिलीप नाकाडे यांसारख्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. राज्यात गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण दिले जात असल्याचे सांगून आदर्श शिक्षकांची बँक स्थापन करून त्यांच्या उत्तम कामांचा अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर तसेच निपुण महाराष्ट्र अभियानाद्वारे वाचन, लेखन व अंकज्ञान कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन- डॉ.पंकज भोयर
महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मोठ्या उत्साहात नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू असून, राज्य शासनाकडून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पीएम श्री स्कूल योजनेप्रमाणेच राज्यातही निवडक शाळांची निवड करून या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड ॲसेसमेंट इंडिया यांच्यासोबत करण्यात आलेला सामंजस्य करार आदींबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रकमेतील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सी. व्ही. रमण सायन्स सेंटर (नागपूर), जिल्हास्तरीय विजेत्यांना इस्रो (बेंगळुरू) तर राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांना थेट नासाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांविषयी माहिती दिली. तर संचालक महेश पालकर यांनी आभार मानले.