नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शिक्षकांच्या अनुदानात टप्पा वाढीचा निर्णय घेतल्याने राज्यातील ६५ हजारावर शिक्षकांच्या पगारात आता २० टक्के वाढ होणार आहे.नाशिक विभागातील सुमारे सात हजारावर शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली.हा निर्णय घोषित होताच दराडेसह शिक्षक आमदारांनी आझाद मैदानात शिक्षकांसोबत जल्लोष साजरा केला.
शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी २०१६ मध्ये २० टक्के अनुदान दिले.पुढे २०२० मध्ये ४० टक्के तर २०२२ मध्ये ६० टक्के झाले आहे तर काही शाळा आजही २० टक्क्यावर आहेत तसेच उच्च माध्यमिक शाळांना २०२० मध्ये २० टक्के अनुदान व २०२२ मध्ये ४० टक्के अनुदान दिले मात्र त्यानंतर आश्वासन देऊनही टप्पा वाढ केली जात नसल्याने अर्धवेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची हेळसांड सुरु आहे.शासन दिरंगाई करत असल्याने राज्यभरातील हजारो शिक्षक
गेल्या ५७ दिवसापासून वाढीव टप्पा अनुदान मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेटमध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात यावा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान देऊन शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी दोन दिवसांपासून मंत्रालय परिसरात शिक्षक आमदार किशोर दराडे,ग.ज.अभ्यकर, श्रीकांत देशपांडे,बाळाराम पाटील,दत्तात्रय सांवत व इतर आमदारांसोबत उपोषणाला बसले होते तसेच शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी यापूर्वी अनेकदा सभागृहात प्रश्न उपस्थित करून वाढीव टप्पा अनुदान देण्याची मागणी केली होती.यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्र्यांकडेही पत्र देऊन शिक्षक बांधवांना न्याय देण्याची मागणी केली होती.
नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या बैठकीत पुढचा टप्पा वाढीचा निर्णय मीच घेईल हे दिलेले आश्वासन आज पाळले आहे.यामुळे आता टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या पगारात आता २० टक्के वाढ होणार आहे.आता २० टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना ४० टक्के तर ४० टक्के वेतन घेणाऱ्यांना ६० टक्के आणि ६० टक्के वेतन घेणाऱ्यांना ८० टक्के वेतन मिळणार आहे.
हा निर्णय जाहीर होताच आज आमदार किशोर दराडे यांच्या सर्व शिक्षक आमदारांनी आझाद मैदानात आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक शिक्षकांच्या समवेत आनंदोत्सव साजरा केला. टप्पा वाढीचा निर्णय झाल्याने शिक्षकांना न्याय मिळाला आहे मात्र सर्व शिक्षकांना १०० टक्के वेतन मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे आश्वासन यावेळी दराडे यांनी दिले.येत्या दोन दिवसातच या घोषणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित होऊन पुढील टप्पा वाढ शिक्षकांना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.