नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा काडीमोड झाला आहे. दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. २०१४ मध्ये दोघांना एक मुलगाही झाला होता. त्याचे नाव झोरावर आहे. आयेशाला पहिल्या लग्नातून दोन मुली आहेत. इन्स्टग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून तिने घटस्फोट घेतल्याची माहिती दिली. परंतु शिखर धवनकडून आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
शिखर आणि आयेशाच्या संबंधांत दुरावा आल्याचे वृत्त याआधीही आले होते. दोघांनीही काही दिवसांपूर्वी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. शिखर धवन सध्या आयपीएल स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातला गेला आहे. आयेशाने पोस्ट केल्यानंतर त्यांच्यात घटस्फोट झाल्याची बातमी पसरली. शिखर धवननेही एक पोस्ट केली परंतु त्याने विभक्त झाल्याबाबत एकही शब्द लिहिला नाही. आयपीएलची जर्सी घालून त्याने एक फोटो पोस्ट करून लिहिले, “कोणतेही लक्ष्य साध्य करण्यासाठी पूर्णपणे झोकून, विचार करून आणि मन लावून काम करावे. आपल्या कामावर प्रेम असले पाहिजे. तेव्हाच भरभराट होते आणि आनंदही मिळतो. आपल्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत करा.”
आयेशाने सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. ती म्हणते, “दोन वेळा घटस्फोट होईपर्यंत मला वाटत होते की हा शब्द खूप घाणेरडा आहे. शब्दांचे मोठे अर्थ आणि ते एकमेकांशी संबंधित असतात, ही एक मजेशीर गोष्ट आहे. एक घटस्फोटित म्हणून मला या गोष्टी जाणवल्या. पहिल्यांदा घटस्फोट झाल्यानंतर मी घाबरले होते. मला वाटले की मी अयशस्वी झाले होते आणि त्या वेळी काही तरी चुकीचे करत होते. मला वाटले मी स्वार्थी आहे आणि सर्वांना पाण्यात पाहते. मला वाटत होते, की मी आपल्या आई-वडिलांना निराश करत आहे. आपल्या मुलींना पाण्यात पाहते. काही वेळा तर मी देवाचा अपमान करत असल्याचेही मला वाटले. घटस्फोट हा शब्द माझ्यासाठी खूपच घाणेरडा होता.”
ती पुढे लिहिते, “आता तुम्ही कल्पना करू शकता की, मला या परिस्थितीतून दुसर्यांदा जावे लागत आहे. एकदा घटस्फोट झाल्यामुळे माझे सर्वकाही पणला लागले होते. मला बरेच काही सिद्ध करावे लागणार होते. आता खरेच दुसरे लग्नही मोडल्यामुळे हे सर्व खूपच भीतीदायक वाटत आहे. पहिल्यांदा जे काही जाणवले ते सर्व डोळ्यांसमोर तरळले. भीती, अपयश आणि निराशा पहिल्यापेक्षा शंभर टक्के जास्त आहे.