जगदीश देवरे, नाशिक
‘शिकायला गेलो एक’या नाटकातली कथा सध्याच्या ट्रेण्डपेक्षा वेगळी आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित एक सदवर्तनी शिक्षक म्हणजे महेश साने. हे साने उर्फ ‘शाने’ गुरूजी पुण्यातल्या सदाशिव पेठेतले रहिवासी आहेत म्हटल्यानंतर आणखी काही सांगायलाच नको. यांना तंबाखु माहिती नाही, सिगारेटला कधी शिवलेले नाहीत, पबमध्ये जाण्याचा विचारही कधी यांच्या डोक्यात आलेला नाही आणि यांच्याकडचा मोबाईल स्मार्ट नसल्याने या जगात बायकांशी संपर्क साधता येईल असे एखादे डेटींग ॲप देखील असू शकते, ही माहिती त्यांना असण्याचे कारणच नाही. मात्र विद्यार्जन करण्यात ते अव्वल. त्यांची शिकवणी म्हणजे एक नंबर. त्यांच्याकडे शिकलेला विद्यार्थी पास होणार म्हणजे होणार. या गुरुजींच्या आयुष्याला एका ट्रॅजेडीची किनार आहेच. त्यांची बायको तिच्या इच्छेविरूध्द त्यांच्यांशी लग्नाला तयार झालेली असते हे त्यांना लग्नानंतर समजते. परंतु, अशाही विमनस्क परिस्थीतीत दोघांना एक मुलगी होण्याइतपत दोघांचा संसार फुलतो. अल्पावधीनंतर त्यांची ही पत्नी भिंतीवर हार घातलेल्या फ्रेममध्ये भुमिका साकारण्यासाठी स्वर्गवासी झालेली असते आणि मग एकुलती एक मुलगी विद्या हिच्या संपुर्ण पालनपोषणाची जबाबदारी साने मास्तर हिमतीने सांभाळत इथवर आलेले असतात.
असे हे आदर्श शिक्षक महेश साने यांच्याकडे कोल्हापुरचे रंगेल आणि तितकेच रग्गेल, ७ वी पास आमदार आदरणीय श्री.खराडे साहेब आपल्या दिवट्या मुलाला, म्हणजे श्याम्याला घेऊन येतात आणि तिथूनच खऱ्या अर्थाने नाटकात सुरू होतो तो विनोदाचा “आदर्श घोटाळा”. श्याम्या जवळपास २१ वर्षाचा. या वयात खरेतर तो ग्रॅज्युएट होवून जायला पाहिजे होता. पण त्याला १० वीच पास होता येत नाही, म्हणून अडकलेला. आमदार त्याला शाने गुरुजींकडे घेवून येतात. सुरूवातीला नकार दिला जातो पण गुरूजींच्या वतीने त्यांची मुलगी विद्या डील करते, रग्गड फी मागते आणि आमदार एका पायावर तयार होतात.
तरूण झालेल्या शाम्याची इ. १० वी ची शिकवणी सुरू होते. श्याम या सोज्वळ नावावर जावू नका. हा श्याम म्हणजे ऑलराऊंडर. इन्स्टावर ‘रंकाळ्याचा मजनु’ नावाने रिळा टाकणारा फेमस चेहरा. तंबाखु आणि शिव्या त्याच्या तोंडात कायम कोंबलेल्या. त्याचा मोबाईल ‘तसल्या’ फोटो व्हिडीओने कायम भरलेला आणि त्याच्यासाठी तमाशा ते पब हे सारे रस्ते तोंडपाठ. शिकवणीत त्यांचा धिंगाणा बघून आदर्श असा लौकिक असलेले मास्तर त्याच्यापुढे हात टेकत नाहीत. उलट त्याला आपलेसे करण्यासाठी शिक्षणातला एक ‘आधुनिक’ प्रयोग करतात. शिकायला गेलो एक….! नाटकाच्या शिर्षकातील शब्दांचा खरा अर्थ रंगमंचावर अवतरतो तो इथूनच…. (इथवर तुम्हाला वाटले असेल की मी नाटकाची अख्खी स्टोरी सांगतो की काय? छे, मग तुम्ही नाटक बघतांना मला शाम्या सारख्या शिव्या नाही का घालणार राव).
‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ ही म्हण मराठीत चांगलीच प्रचलीत आहे. परंतु, आता अभिजात झालेल्या मराठीत ‘शिकायला गेलो एक…’ सारखे नवे नवे प्रयोग होणार असतील तर स्वागतच करावे लागेल. एक निखळ विनोदी आणि प्रेक्षकांची करमणूक करणारे हे तुफान नाटक सध्या चांगलेच चर्चेत आहे. गौरी थिएटर्स निर्मीत आणि प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित या नाटकाबद्दल सांगायचे झाले तर हे आवर्जुन सांगावे लागेल की, यात फक्त प्रशांत दामले यांची भूमिका आहे इतकेच सांगुन चालणार नाही तर प्रशांत दामले (महेश साने मास्तर) यांच्याबरोबरच श्याम्याची भुमिका करणारा ऋषिकेश शेलार आणि सुशील इनामदार (कोल्हापूरचे आमदार) यांच्या देखील या नाटकात प्रमुख भुमिका आहेत. असे म्हणणे यासाठी जास्त न्यायोचित होईल कारण ऋषिकेश आणि सुशील या दोघांनी प्रशांत दामले यांच्या बरोबरीने हे नाटक अक्षरश: उचलून धरले आहे.
खास कोल्हापुरी ठेच्याचा ‘चरचरीत’ स्वाद असलेल्या या दोन भुमिका जेव्हा सदाशिव पेठेतल्या वरण भातासोबत (नंतर त्याची पार हैद्राबादी बिर्याणी होते तो भाग अलाहिदा) आणि माईल्ड फोडणी दिलेल्या विद्या नावाच्या आमटी सोबत प्रेक्षकांना थाळीमध्ये दिल्या जातात ना, तेव्हा अस्सल मनोरंजनाच्या शाहीस्नानाला सुरूवात होते असे म्हणावे लागेल. अनघा भगरे (विद्या), सम्रुध्दी मोहरीर (हेलन) आणि चिन्मय माहूरकर (काका) यांच्या लक्षवेधी भूमिका यात आहेत. प्रशांत दामले ही रंगमंचावरचे विक्रमवीर आहेत. त्यांच्या टाईमींग बद्दल मी कोण लागून गेलो काही बोलणारा? अफलातून. नाटकात एक सीन आहे. साने मास्तर अटी आणि शर्ती नुसार शाम्याकडची तंबाखू खातात. त्यावेळी, पहिल्यांदा तंबाखू खाल्यानंतर हळूहळू लागणारी किक आणि शेवटी “हे म्हणजे काही तरी जरा वेगळंच आहे” असे म्हणत जमिनीवर आदळणारे मास्तर दामलेंनी इतके छान रंगवले आहेत की त्यावर प्रशांत दामले शैलीतला खास ट्रेडमार्क मारल्याचा अनुभव येतो.
आमदार वडील आणि शाम्या या दोघांचे कॉमन लफडे म्हणजे ‘हेलन’. हे पात्र शेवटच्या काही मिनीटांसाठी रंगमंचावर येते आणि मग तिला एकमेकांपासून लपवतांना साने मास्तरांची दमछाक होते. हा पार्ट प्रशांत दामलेंसाठी नविन नाही. त्यांच्या ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकातील भुमिकेची आठवण करून देणारा हा या नाटकातला शेवट खळाळून हसविल्याशिवाय प्रेक्षकांना घराकडे जाण्यासाठी एक्झीट घेऊच देत नाही.
कथानकाचा विषय द.मा.मिरासदार यांच्या ‘व्यंकुची शिकवणी’ या कथेवर बेतलेला आहे. हे नाटक बघायला जर आज द.मा. हयात असते ना, तर त्यांना देखील त्यांच्या कथेतला व्यंक्या जिंवत असल्याचा भास झाला असता इतका परिपूर्ण न्याय लेखक/दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी ही नाट्यसंहिता लिहीतांना द.मा. यांच्या कथेला दिलेला आहे. दादरकरांची ही रेल्वे विनोदाचे डबे घेवून अशी धडाडत निघते की प्रेक्षक या प्रवासात हसून हसून बेजार होतात, आनंदाने रडून रडून थकतात आणि मग तिकीटाचे पैसे दुपटीने वसूल झाल्यानंतरच फलाटावर उतरतात असा अनुभव हे नाटक बघतांना मिळते.
अद्वैत दादरकर या लेखकानेच हे नाटक दिग्दर्शीत करून प्रत्येक पात्र अपेक्षेप्रमाणे घडवून घेतले आहे. अशोक पत्की यांच्या संगीताची उत्तम जोड आहेच. अख्खे नाटक सदाशिव पेठेतल्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेत घडतांना बघायला मिळते. एक रूम विद्याची, दुसरी मास्तरांची, हॉलमध्ये शिकवणीचा वर्ग असे नेटकं नेपथ्य प्रदीप मुळ्ये या नेपथ्यकारांनी साकारले आहे. हे नाटक बघितल्यानंतर, बघायला गेलो नाटक आणि निराशा पदरी पाडून आलो अशी अवस्था अजिबात होणार नाही याची काळजी या नाटकाची निर्मीतीकार गौरी प्रशांत दामले यांनी निश्चीतपणे घेतली आहे.
जगदीश देवरे – ९८८१०५४५५०