नागपूर – अनेक जण उत्सुकता किंवा स्टेटस म्हणून आयफोन वापरतात. मात्र, काही कारणामुळे त्यांना पुन्हा अँड्रॉईडवर यावेसे वाटते. मात्र, हा बदल इतका सहजासहजी नसतो. कारण, आयफोनमध्ये असलेला डाटा अँड्रॉईडमध्ये घेणे हे मोठे आव्हान असते. मात्र, आता यात मोठा दिलासा मिळणार आहे.
गुगलने एका नव्या फिचरची घोषणा केली आहे. त्या फिचरच्या मदतीने आयफोन युजर्स अँड्रॉइड फोनमधील चॅट हिस्ट्री सोप्या पद्धतीने स्थलांतरित करू शकणार आहेत. आयफोनमधून अँड्रॉइड फोनमध्ये स्थलांतरित होणार्या युजर्सना या फिचरची मदत होणार आहे. आयफोनचा आवश्यक डाटासुद्धा तुमच्या अँड्रॉइडमध्ये घेता येणार आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी युजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता ही प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे.
चॅट हिस्ट्रीचे स्थलांतर आता पिक्सेल फोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी घोषणा गुगलने केली आहे. अँड्रॉइड १२ चे अनावरण करण्यासह आयफोनमधून अँड्रॉइडमध्ये डाटा स्थलांतर करण्याची प्रक्रिया खूपच सोपी बनविण्यात आली आहे, असे गुगलने म्हटले आहे. अँड्रॉइड १२ मध्ये येणार्या सर्व फिचरमध्ये हे फिचर असेल. आयफोनमधून अँड्रॉइडमध्ये स्थलांतरित होणार्या युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आता हे फिचर आल्यानंतर युजर्सना ताण घ्यायची गरज नाही. एका केबलद्वारे आयफोन आणि अँड्रॉइडला जोडता येणार आहे.
तुम्ही एकदा परवानगी दिली की अँड्रॉइड डिव्हाइस आयफोनचे अॅप्स आपोआप मॅच करून सर्व आवश्यक अॅप्स गुगल प्ले स्टोअरमधून तुमच्या डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल करेल. त्याशिवाय तुमच्या सर्व चॅट हिस्ट्री आणि आवश्यक डाटा तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये जाईल. आयफोनमधून अँड्रॉइड फोनमध्ये स्विच करताना व्हॉट्सअॅपचा डाटासुद्धा तुम्ही अँड्रॉइड फोनमध्ये स्थलांतरित करू शकणार आहात. डाटा ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्याकडे USB-C लाइटनिंग केबल असणे आवश्यक आहे.