नाशिक – शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या आधार प्रमाणिकरणाच्या यादीत असून त्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण केले नाही, अशा शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे नाशिक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार १०४ शेतकऱ्यांच्या आधारचे प्रमाणिकरण करणे बाकी असून, याकरिता जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँक, तालुका उपनिबंधक व सहाय्यक निबंधक कार्यालय तसेच सहकारी संस्था कार्यालयाकडे आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मयत कर्जदाराची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर सादर करण्यासाठी बँकांना ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आधार प्रमाणिकरण करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले पासबुक व आधार कार्ड घेऊन प्रमाणिकारण करून घ्यावे असेही, जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी बँकेचे नोडल अधिकारी व तालुका उपनिबंधक व सहायक निबंधक तसेच सहकारी संस्था यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधुन त्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्याची कार्यवाही करावी. तसेच सदर आधार प्रमाणिकरण करण्याची अंतिम संधी असून, आधार प्रमाणिकरण न झाल्यास योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले आहे.