नाशिक – नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली थांबवा यासाठी शेतकऱ्यांनी गावागावात फलक लावले आहे. पाटील यांची नाशिक ग्रामीणला नेमणूक झाल्यानंतर त्यांनी विविध शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुडालेले पैसे मिळवून दिले. शेतकऱ्यांची देणी देण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे कोरोना असला तरीही शेतकऱ्यांमध्ये समाधान होते शेतकरी बिनदास्त शेतमाल विक्री करू लागले होते. मात्र त्यांच्या बदलीची बातमी ऐकताच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांची बदली थांबवा असे फलक पिंपळगाव बसवंत शहरासह गावागावात झळकू लागले आहे.
सचिन पाटील यांची नाशिक ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी द्राक्ष, डाळींब, भाजीपाला आदी पीके खरेदी करुन पैसे न देताच शेतकरी, नागिरकांची फसवणूक केलेल्यांविरोधात विशेष मोहिम राबवली. तसेच गुन्हेगारीला देखील चाप बसविला. आजवर प्रलंबीत असलेल्या गुन्ह्यांच्या फाईलवरील धुळ झटकण्यात आली. त्यातून तक्रारदारांना न्याय देण्याचे काम नाशिक ग्रामीणच्या पोलीस ठाण्यात सुरू झाले.
शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता, त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्याप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष तयार केला. शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून व्यापाऱ्याकडून त्यांचे लाखो रुपये शेतकऱ्यांना परत करण्यात आले. ज्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला अशा व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. काही व्यापाऱ्यांना अटक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व लहरी निसर्ग यामुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिस अधीक्षकांच्या रूपाने पोलिसांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे तो सुखावला आहे.शेतकऱ्यांचे सिघम , हितचिंतक पोलीस अधीक्षक सचिन पाटील त्यांच्या बदलीची बातमी ऐकताच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. त्यानी त्यांची बदली थांबवा यासाठी बदली थांबवा असे फलक गावागावात लावले आहे. या शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार वरिष्ठ पातळीवर घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गांकडून व्यक्त होत आहे.