नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी २३ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करण्यासाठी सहाय करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटी आदींद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी १६ जून २०२५ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राबविण्यात येत आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेले संभाव्य देश असे : युरोप- जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, १२ दिवस, फलोत्पादन, सेंद्रीय शेती आणि दुग्धोत्पादन. इस्त्राईल, ९ दिवस, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण. जपान, १० दिवस, सेंद्रीय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान. मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स, १२ दिवस, फळे, भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रणाली. चीन, ८ दिवस, विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो. दक्षिण कोरिया, ८ दिवस, आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान.
अनुदानाचा तपशील : शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील.
अभ्यास दौऱ्यासाठी पात्रता : अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा, स्वत:च्या नावे चालू कालावधीचा सातबारा व ८- अ उतारा असणे आवश्यक आहे, शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करणे आवश्यक राहील, शेतकऱ्याचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे, शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबातील इतर सदस्यास सोबत नेण्याची परवानगी राहणार नाही, आधार प्रमाणपत्र आवश्यक, शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण असावे, कमाल वयाची अट नाही, शेतकऱ्याने प्रस्तावासोबत शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एमबीएमबीएस डॉक्टरचे) जोडणे आवश्यक राहील.
शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान तीन महिन्यांपेक्षा जास्त असावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता आणि कंत्राटदार नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र, राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापीठ, स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत) अर्थसाहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिक तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच कोरोना विषयक तपासणी करणे बंधनकारक राहील.
शेतकऱ्याने अर्जासमवेत जोडावयाची कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज, प्रपत्र १, स्वयंघोषणापत्र, वैध पारपत्राची छायांकित प्रत, सातबारा उतारा, ८-अची मूळ प्रत (कालावधी मागील सहा महिने), शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, वैद्यकीय अधिकाऱ्याचे मूळ स्वास्थ्य प्रमाणपत्र.
तालुकास्तरावरून विहित कालावधीमध्ये प्राप्त पात्र प्रस्तावांची अभ्यास दौऱ्याच्या निवडीकरीता जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करण्यात येईल. ज्येष्ठता क्रमवारीनुसार जिल्ह्यास प्राप्त लक्ष्यांकानुसार एक महिला शेतकरी, एक केंद्र, राज्य पुरस्कार प्राप्त तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. या योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी २३ जुलै २०२५ पर्यंत जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.