नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेत शिवार हिरवं करण्यामागे मोलाची भूमिका बजावणार्या महिला शक्तीचा सन्मान ‘शेतीतल्या नवदुर्गा’ या व्हिडिओ मालिकेतून केला जातो. ‘सह्याद्री फार्म्स’कडून दरवर्षी नवरात्रांत ९ दिवस ९ कथांमधून या शेतीमातीतील जगदंबेचा जागर केला जातो. या दृकश्राव्य मालिकेचा ५ वा सिझन या घटस्थापनेपासून, सोमवार (ता.२२ सप्टेंबर) पासून सुरु होत आहे. यंदा या मालिकेत शेती करणाऱ्या महिलांबरोबरच शेतीपूरक व्यवसाय उभे करणाऱ्या उद्योजक महिलांच्या कर्तृत्वाचाही वेध घेतला जाणार आहे.
शेती क्षेत्र आव्हानांतून जात असतांना ‘सह्याद्री’च्या शिवारातील महिला शक्तीने या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही नेहमीच जिद्दीचे दर्शन घडविले आहे. या शक्तीचा सन्मान करण्यासाठीच ‘शेतीतल्या नवदुर्गा’ हा दृकश्राव्य मालिकेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ‘सह्याद्री फार्म्स’च्या परिवारातील जिद्दी कर्तृत्ववान महिलांची कथा नवरात्रकाळात दररोज एक अशी प्रसारीत केली जाते. सोशल मिडियाच्या सर्व व्यासपीठांवरुन एकाच वेळी ही दृकश्राव्य मालिका प्रसिद्ध होते. या उपक्रमाचे यंदाचे हे ५ वे वर्ष आहे. मागील ४ वर्षात दर वर्षी ९ अशा ३६ महिलांच्या यशोगाथा प्रसारित करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील लाखो महिलांनी हे व्हिडिओ पाहिलेत. देशभरातून या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला. काही देशपातळीवरील माध्यमांनीही या उपक्रमाची दखल घेतली आहे.
अडचणीच्या काळात शेती सारखे आव्हानात्मक क्षेत्र सावरुन धरण्यात शेतीतील महिला शक्तीचे योगदान खूप मोठे आहे. जिद्द, चिकाटी, सातत्य या गुणांच्या जोरावर या महिलांनी शेतीचे चित्र पालटवले आहे. फक्त पिक उत्पादनांपुरती शेती करणे पुरेसे ठरणार नाही याची जाणीव झालेल्या या महिला शक्तींनी सोलर ड्रायर, ज्यूस फार्म या पूरक उद्योगाकडे वळण्यास सुरवात केली आहे. मागील काही वर्षात या महिलांनी शेती पूरक उद्योगांतही वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या ५ व्या वर्षांच्या ‘शेतीतील नवदुर्गा’ या मालिकेत शेतीतील या उद्योजिकांच्या कार्याचीही विशेष दखल घेण्यात आली आहे.
सोमवार (ता.२२) घटस्थापनेपासून सलग ९ दिवस या व्हिडिओ कथा ‘सह्याद्री फार्म्स‘कडून यूट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्राम, लिंक्ड इन या विविध सोशल मिडिया प्लॅटफार्मवरुन प्रसारीत करण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदीला बळ देण्याचा प्रयत्न
‘‘शेतीतल्या महिलांच्या योगदानाचा सन्मान होणे आवश्यक आहे. नवरात्र हा शक्तीचा उत्सव आहे. सह्याद्रीच्या परिवारातील महिलाशक्तीने शेती क्षेत्रावर ठसा उमटवला आहे. त्यांच्या यशकथा सोशल मिडियाच्या विविध व्यासपीठावरुन व्हिडिओच्या रुपात गेली ५ वर्षे सर्वांसमोर आणत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून शेतीतल्या महिलांबरोबरच बरोबर शहरी-निमशहरी भागातल्या महिलांनाही प्रेरणा मिळत आहे. महिलांच्या शक्तीला सन्मान करण्याबरोबर त्यांच्या उमेदीला बळ देण्याचाही आमचा हा प्रयत्न आहे.‘‘
विलास शिंदे
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सह्याद्री फार्म्स