शेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेगाव येथील गजानन महाराज मंदिरांत संत श्री गजानन महाराजांची आज 112 वी पुण्यतिथी साजरी होत आहे. यानिमित्याने मोठ्या संख्येने भाविक शेगांव येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगांव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषता ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्यासुद्धा सहभागी होतात.
देशातील शिस्तबद्ध ,स्वच्छतेबाबत विलक्षण आग्रही, नियमांची अंमलबजावणी आणि मनुष्यबळ याबाबतीत सर्वोत्तम असे देवस्थान कोणते असेल तर ते शेगाव च्या गजानन महाराजांचं स्थान आहे. श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.
शेगावचे श्री गजानन महाराज, हे लाखो करोडो भाविकांचे श्रद्धा स्थान, त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. सतत भ्रमण करणे, जागा मिळेल त्या जागी राहणे, मिळेल ते खाणे अशी त्यांची दिनचर्या चरित्रातून स्पष्ट होते. भक्तांवर आलेली संकटे दूर करून त्यांना देवाचा साक्षात्कार करून दिल्याची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत.
"गण गण गणात बोते"
आध्यत्मिक गुरू संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली.शेगाव येथील मंदिर हे उत्तम व्यवस्थापन व स्वच्छेतेसाठी प्रसिद्ध आहे.संत श्री गजानन महाराजांनी शिकवलेली मूल्ये शेगाव संस्थानाद्वारे आजही उत्तमरीत्या जोपासली जात आहेत. pic.twitter.com/MFjHpz9fFk— Bhakti Kulkarni (मोदी का परिवार ) (@KbhaktiBawaskar) September 1, 2022
सध्या शेगावात जवळपास हजारोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्व, रथ, मेनादिंडी आदि वैभवासह सपूर्ण गावात नगर परिक्रमा करत असते. यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात हरी नामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभरातील उत्सवापैकी हा देखील एक मोठा उत्सव असतो.
आज सकाळी 10 वाजता यागाची पुर्णाहूती व अवभृत स्नान श्रीचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्त व विश्वस्त मंडळ व ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत पार पडला. दुपारी उत्सवाची पालखीचे श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, पताका टाळकरी, अश्वासह नगर परिक्रमेची निघाली, तर सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा होणार आहे. रात्री 8 ते 10 हभप भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. २ सप्टेंबर रोजी हभप श्रीधरबुवा आवारे मु.खापरवाडी यांचे सकाळी 6 ते 7 काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला होणार आहे.
Shegaon Gajanan Maharaj Punyatithi Today Celebration Festival