शेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळ्याच्या सुटीत जर तुम्ही शेगावला येण्याचा निर्णय घेण्यात येत असाल तर तुमच्यासाठी आनंद वार्ता आहे. कारण, गजानन महाराज देवस्थानने साकारलेल्या आनंद सागर या प्रकल्पातील आध्यात्मिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे केंद्र आजपासून खुले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आनंद सागर बंद आहे.
केवळ विदर्भातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रसिद्ध आणि अध्यात्मिक दृष्ट्या नावलौकिक प्राप्त झालेले शेगाव येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान, संस्थान येथे दर्शनासाठी दररोज भाविकांचे मोठ्या संख्येने गर्दी होत असते. तसेच महाराष्ट्रासह विविध राज्यातील आणि परदेशातील भाविक देखील येथे दर्शनासाठी रांगा लावतात. येथील श्री गजानन महाराज मंदिराबरोबर सन २००१पासून ३०० एकरवर उभारण्यात आलेले आनंद सागर हे देखील धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते भाविक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आजपासून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून आनंद सागर पुन्हा एकदा सुरू होणार अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती. आता संत गजानन महाराज संस्थाननेच एका फलकाद्वारे नम्र निवेदन देऊन फक्त आध्यत्मिक केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.आध्यात्मिक केंद्राचा काही भाग कोविड काळानंतर आहे त्या स्थितीमध्ये सुरु करण्यात आलेला आहे.
प्रवेश सेवार्थ (निःशुल्क) राहील. वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा आहे. सायंकाळी ४ वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. शासन निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. या बंद काळामध्ये निधी अभावी श्री संस्थानचे सर्व सेवाभावी उपक्रम व नियोजीत अत्यावश्यक विकास कामे थांबविण्यात आली होती.
आनंद सागरमधील फक्त अध्यात्मिक केंद्र सुरू झाले आहे. येथे खूप मोठ्या प्रमाणावर बदल आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. नूतनीकरणामुळे त्यामुळे पूर्वीचा आनंद सागर आणि आता नव्याने सुरू होणारे आनंद सागर यात खूप मोठा फरक असणार आहे. आता फक्त अध्यात्मिक केंद्रात जाऊन फक्त मंदिरांमध्ये दर्शन घेता येणार आहे. तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची उभारणी केली होती.
अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगप्रसिद्ध होऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढले होते, मात्र मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पुढील काळात टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी इतरही काही सोयी सुविधा याठीकाणी सुरू होणार आहेत, असे सांगण्यात येते.
Shegaon Anand Sagar Project Religious Centre Open