शेगाव – येथील गजानन महाराज संस्थानचे प्रमुख शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज सायंकाळी ५:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.शिवशंकर भाऊंनी संत गजानन महाराजांचे कार्य जगभर पोहचविले. मागील अनेक वर्षांपासून संस्थानच्या माध्यमातून महाराष्ट्रात व मध्यप्रदेश मध्ये महाराजांचे मंदिर उभारणीचे काम त्यांनी केले. संत गजानन महाराज यांना अपेक्षित असलेले गोर गरिबांचे कल्याण व सेवा करण्याचे काम भाऊंनी आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे केले. असा हा सेवेकरी आज आपल्यामधून निर्वातला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी शेगाव संस्थानच्या कार्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर व्यवस्थापन कौशल्य, कल्पकतेच्या बळावर संस्थानचा चेहरामोहरा बदलला. मानवसेवेला वाहून घेतलेले सेवकरी निर्माण केले. शेगावच्या मंदिर परिसरात स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. मंदिरातील दर्शनरांगेत, सोयी-सुविधांची भर घालत अमूलाग्र बदल केले. भाविकांना सहज, सुलभ, आनंददायी दर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली. भाविकांसाठी आदर्शवत भक्तनिवासांची उभारणी केली. अत्यल्प किंमतीत महाप्रसादाची व्यवस्था केली. भक्तांचा विश्वास, श्रध्देच्या बळावर शेगाव संस्थानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सेवेकरांच्या माध्यमातून भाविकांना संस्थानाशी जोडून गेतलं. मंदिराच्या उत्पन्नातून भाविकांना सेवा पुरविण्याबरोबरच सर्वोत्कृष्ठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी केली. आनंदसागरसारखी जागतिक किर्तीची बाग उभारुन अध्यात्मिक पर्यटनाला चालना दिली.
भाऊंनी संस्थानचे काम अतिशय पारदर्शक व स्वछ ठेवले. संस्थानच्या माध्यमातून अनेक शाळा व उच्चशिक्षण संस्था निर्माण केल्यात. आनंद सागर सारखे भव्य दिव्य पर्यटन स्थळ निर्माण केले. प्रामाणिकपणे व सचोटीने प्रत्येक पैशाचा हिशोब भाऊंनी ठेवला. जेव्हा जेव्हा काही नैसर्गिक संकटं आली त्यावेळी संस्थांनच्या माध्यमातून भाऊंनी तात्काळ मदत केली. कोरोना काळात देखील जिल्ह्याला मोठा आधार संस्थानच्या माध्यमातून मिळाला आहे. आज शेगावला जो दर्जा प्राप्त झाला आहे त्याचे संपूर्ण श्रेय आदरणीय भाऊंना जाते. त्यांच्या जाण्याने खरे गजानन भक्त हरवले आहेत, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.