इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात शिक्षण ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, विशेषतः उच्च शिक्षणासाठी अनेक तरुण-तरुणी प्रयत्न करत असतात. परंतु जसजसे वय वाढत जाते, त्यानुसार मग पालकांकडून त्या मुला-मुलींचे विवाह करण्यात येतात, विवाह झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ शकतात. विशेषतः तरूणीच्या बाबतीत असे प्रकार बहुतांश वेळा घडतात. परंतु तरीही काही मुली किंवा तरूणी लग्न झाल्यानंतर देखील शिक्षण सुरू ठेवतात. किंबहुना लग्न झाल्यानंतर त्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी अनेक अडथळे पार करत असतात. अशाच प्रकारच्या अडचणीवर मात करीत बिहारमधील एका महिलेने नवजात शिशुला जन्म दिल्यानंतर देखील परीक्षा दिली, यासाठी तिला मोठे दिव्य पार करावे लागले.
बिहारमधील पूर्णिया विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या सेकंड लिटरेचर तथा साहित्याच्या परीक्षेला बसण्यासाठी यास्मीनही महिला आपल्या नवजात मुलासह परीक्षा केंद्रावर पोहोचली. पूर्णिया कॉलेजच्या विज्ञान भवनात परीक्षा सुरू होती. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. यास्मीन ही पूर्णिया शहरातील चिमणी बाजार येथील रहिवासी आहे. शिक्षकांनी चौकशी केली असता सात दिवसांपूर्वी यास्मिनला मुलगा झाल्याचे समजले. यास्मिनला सिझेरियन प्रसूतीने बाळ झाले. त्याच्या पोटात अजूनही टाके आहेत. तरीही तिच्या वेदनांची पर्वा न करता ती परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहोचली. विशेष म्हणजे यास्मिन परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर तिच्या एका नातेवाईकाने नवजात बालकाची काळजी घेतली. यास्मिनलाही पोटात ऑपरेशनचा त्रास होत होता. तरीही परीक्षेत उत्तीर्ण होऊन स्वावलंबी होण्याच्या ध्येयावर तिने लक्ष केंद्रित केले आहे. याबद्दल त्यांचे नातेवाईक तसेच शिक्षकांकडून तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे.