छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी भाजपला घरचा अहेर दिला आहे. एकीकडे सरकार शासन आपल्या दारी मोहीम राबवित असताना बागडे यांनी एका अडलेल्या फाइलसाठी आमदार प्रशासनाच्या दारी असे अनोखे आंदोलर करून लक्ष वेधले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात वर्षभरापासून दाखल केलेल्या सिंचन विहीर व गोठ्याच्या तब्बल ७०० फाइल धूळखात पडून आहेत. अधिकाऱ्यांकडून या फाइल मंजूर करण्यातच आल्या नसल्याने त्या पडून होत्या. त्यामुळे जोपर्यंत या फाइल मंजूर केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत माजी विधानसभा अध्यक्ष भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी घेतला होता.
बागडे यांनी थेट पंचायत समितीमध्येच आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. विशेष म्हणजे शुक्रवारी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करायचे होते. मात्र अधिकारी फाईलवर सही करत नसल्याने हे सर्व प्रकरण प्रलंबित पडले. त्यामुळे संतापलेल्या बांगडेंनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठले आणि आंदोलनाला सुरुवात केली.
आठ तास ठिय्या आंदोलन
पंचायत समितीमध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांनी विहिरीच्या फायली पूर्ण करण्यासाठी ८ तास ठिय्या आंदोलन केले होते. आमदार बागडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रात्री १२ ते १ पर्यंत १५० फायली पूर्ण झाल्या होत्या. तसेच शुक्रवारी दिवसभरात अनेक फायली पूर्ण झाल्या आहे. अशाप्रकारे एकूण ४६५ फायली पूर्ण झाल्या. सध्या गटविकास अधिकारी नसल्याने यावर स्वाक्षऱ्या बाकी आहे. तर येथील गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची रात्रीतूनच बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर संजय गायकवाड हे बीडीओ म्हणून रुजू झाले. ते या सर्व विहिरीच्या कार्यरंभ आदेशावर स्वाक्षऱ्या करणार आहे.