मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. शेअर विक्री केल्यानंतर त्याचे पैसे आता २४ तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. हा नियम आजपासून लागू झाला आहे. शेअर बाजाराचे नियमन करणार्या सेबी या संस्थेने टी प्लस वन ही नवी सेटलमेंट व्यवस्था लागू केली आहे. त्या अंतर्गत या व्यवस्थेच्या नियमांना टप्प्याटप्प्याने लागू केले जात आहे.
भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळ (सेबी) च्या माहितीनुसार, शेअर बाजार एक्सचेंज, क्लिअरिंग कॉरपोरेशन आणि डिपॉझिटरी यांच्या संयुक्त निर्णयानुसार नवीन व्यवस्था लागू केली जाणार आहे. त्याअंतर्गत वास्तविक व्यवसायाच्या एका दिवसाच्या आत गुंतवणूकदारांच्या पैशांचा निपटारा सुनिश्चित करावा लागेल. सध्या बीएसई वर टी प्लस टू व्यवस्था लागू आहे. त्यामध्ये शेअर विक्री केल्यानंतर निपटारा पूर्ण होण्यासाठी दोन दिवस लागतात. यापूर्वी ही व्यवस्था एक जानेवारी २०२२ पासून लागू केली जाणार होती. आता २५ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. सर्वप्रथम यामध्ये सुरुवातीला १०० लहान कंपन्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चपासून पुढील ५०० कंपन्यांवर नियम लागू केले जातील. शुक्रवारी सुटी असेल तर पुढील व्यवसायाच्या दिवशी लागू करावा लागेल.
कंपन्यांची रँकिंग
टी प्लस वन सेटलमेंट व्यवस्था लागू करण्यासाठी सूचीबद्ध कंपन्यांची रँकिंग ऑक्टोबरच्या सरासरी दैनिक बाजार भांडवलाच्या आधारावर केली जाणार आहे. जर कोणताही स्टॉक एनएसई आणि बीएसई या दोन्ही एक्सचेंजवर सूचीबद्ध असेल, तर बाजार भांडवलाची गणना उच्च ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या एक्सचेंजमध्ये स्टॉकच्या किमतीवर आधारित असेल. ज्या कंपन्यांची ऑक्टोबरनंतर नोंदणी झाली असेल, तर त्यांच्या बाजार भांडवलाची गणना व्यवसाय सुरू झाल्याच्या ३० दिवसांच्या सरासरी ट्रेडिंग मूल्याच्या आधारावर केली जाईल.