मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाच्या विरोधात हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यामुळे शेअर मार्केट चांगलेच कोसळले. एलआयसीने देखील अदानीमध्ये गुंतवणूक केली असल्यामुळे सामान्य जनतेचा पैसा बुडाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र एलआयसीने आपल्याला काहीही फरक पडला नाही आणि भविष्यातही कुठलाच धोका नाही, असे स्पष्ट केले आहे. उलट एलआयसी नफ्यातच असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने एका गैरव्यवहाराबाबत अहवाल प्रसिद्ध केला. अदानी उद्योग समूहाचा या कथित गैरव्यवहाराशी थेट संबंध असल्याचे हिंडेनबर्गचे म्हणणे आहे. त्यामुळे अदानी समूहाला दोन लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज देणाऱ्या बँका सतर्क झाल्या आणि आढावा घ्यायला सुरुवात केली. दरम्यान शेअर मार्केट कोसळल्यामुळे गुंतवणुकदारही टेन्शनमध्ये आले. अश्यात एलआयसी आणि स्टेट बँक अॉफ इंडियाने स्पष्टीकरण जारी केलं आहे.
एलआयसीने तर कुठलाच धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. अदानीमध्ये आपण ३० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे आणि २७ जानेवारीच्या बाजारानुसार त्याची किंमत ५६ हजार कोटी एवढी आहे. त्यामुळे तसाही २६ हजार कोटींचा निव्वळ नफा आहे, असे एलआयसीने म्हटले आहे. एलआयसीने अदानी समूहात अंडर मॅनेजमेंट (AUM) केवळ ०.९७५ टक्के गुंतवणूक केली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एसबीआय म्हणते…
स्टेट बँक ऑफ इंडियाने लार्ज एक्स्पोजर फ्रेमवर्कच्या मर्यादेत अदानी समूहाला कर्ज दिल्यामुळे कर्जाला कुठलाही धोका नाही, असे स्पष्ट केले आहे. तरीही आपल्या कर्जांना धोका निर्माण होईल, अशा घटनांवर आपलं लक्ष असल्याचे एसबीआय म्हणते. तसेच अदानी समूहाची बहुतांश संपादने विदेशी कर्जे किंवा भांडवली बाजारातून झाली आहे, त्यामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेला सध्या तरी कुठलाही धोका नाही, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक स्वामीनाथन जे यांनी म्हटले आहे.
Share Market LIC SBI Adani Group Investment Clarification