मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात नियमांना तिलांजली देत सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीवर ताव मारणारे लवकरच रडारवर येणार आहेत. नुकतीच यासंदर्भात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी) सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे.
हिंडनबर्ग संस्थेचया अहवालात अदानी समूहावर लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच अदानी समूहाच्या शेअरच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत असल्याचाही तपास करण्यात येणार आहे. सेबीने सुप्रीम कोर्टात २० पानी शपथपत्र सादर केले आहे. अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरणीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर सोमवारी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.
सेबीने न्यायपालिकेसमोर लिखित उत्तर दाखल केले. त्यात शॉर्ट सेलिंग काय आहे आणि हिंडनबर्ग अहवालाविषयीचा ऊहापोह करण्यात आला आहे. सेबीने शेअर बाजारात शॉर्ट सेलिंग बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे प्रतिपादन केले. नियमांच्या अनुषंगाने शॉर्ट सेलिंगचे उल्लंघन झाल्याप्रकरणात चौकशी करण्यात येत असल्याचे सेबीने स्पष्ट केले. हिंडनबर्ग अहवालापूर्वी आणि त्यानंतर बाजारातील घडामोडींचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याची चौकशी करण्यात येणार आहे. अशी परिस्थिती हातळण्यासाठी बाजाराकडे मोठी यंत्रणा असल्याचा दावा सेबीने केला आहे.
अदानी समूहाच्या शेअरच्या घसरणीचा परिणाम नाही
हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समूहात भयकंप आला होता. अदानी समूहाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हिंडनबर्ग रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर, अदानी समूहाच्या भांडवलात १२० अब्ज डॉलरपेक्षा मोठी घसरण झाली आहे. सेबीने दावा केला आहे की, अदानी समूहाच्या शेअरच्या घसरणीचा कुठलाही परिणाम शेअर बाजारावर झाला नाही.
टोटल एनर्जीजने दिला झटका
अदानी समूहाला फ्रांसच्या टोटल एनर्जीज या कंपनीने मोठा झटका दिला आहे. अदानी समूहात या विदेशी गुंतवणूकदाराने मोठ्या गुंतवणुकीची तयारी केली होती. हायड्रोजन प्रोजेक्टसाठी अदानी समूहासोबत ५० अब्ज डॉलरचा प्रस्ताव कंपनीने राखीव ठेवला आहे.
Share Market Investor SEBI Strong Action Adani Row