इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजार म्हणजे जुगार समजला जातो. यामध्ये एखाद्या शेअरची किंमत इतकी प्रचंड वाढते की, गुंतवणूकदारांना प्रचंड नफा किंवा फायदा मिळतो. व्हिसा आउटसोर्सिंग कंपनी बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेसने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
ही कंपनी आता गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 13 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत बोनस शेअर्सची शिफारस केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1: 1 या प्रमाणात बोनस शेअर्स देईल. म्हणजेच, गुंतवणूकदारांना बोनसमध्ये 1 शेअर मिळेल.
वर्षभरात 270 टक्के परतावा
बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेसच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात जवळपास 270 टक्के परतावा दिला आहे. दि. 16 एप्रिल 2021 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 89.15 रुपयांच्या पातळीवर होते.
13 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 328.30 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि हे शेअर्स विकले नसतील, तर सध्या या पैशाचे मूल्य 3.68 लाख रुपये झाले असते.
बीएलएस इंटरनॅशनलच्या समभागांनी या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 72 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या समभागांनी 43 टक्के परतावा दिला आहे. 24 एप्रिल 2020 रोजी BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेसचे शेअर्स 29.90 रुपयांच्या पातळीवर होते.
दि. 13 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 328.30 रुपयांवर बंद झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 11 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 81 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची उच्च पातळी 343.95 रुपये आहे.