इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारात चढ-उतार सुरूच असतात एखाद्या शेअरची किंमत घसरते, परंतु काही वेळा एखाद्या शेअरची किंमत झतकी वाढते की गुंतवणूकदार मालामाल होऊन जातात. अशाच प्रकारच्या एका शेअरने गुंतवणूकदारांना प्रचंड श्रीमंत बनविले आहे.
अदानी ग्रुपच्या ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने काही वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. विशेष म्हणजे 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत कंपनीचे शेअर्स 30 रुपयांवरून 2,665 रुपयांपर्यंत वाढले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीच्या समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 9,000 टक्के परतावा दिला आहे. इतके नव्हे तर कंपनीच्या समभागांनी यावर्षी आतापर्यंत जवळपास 98 टक्के परतावा दिला आहे.
दि. 22 जून 2018 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 29.45 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीचे शेअर्स 4 मे 2022 रोजी NSE वर 2,665 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या समभागांनी गेल्या 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 8,949 टक्के परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने 22 जून 2018 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 90.52 लाख रुपये झाले असते.
15 मे 2020 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारावर अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 230.25 रुपयांच्या पातळीवर होते. दि. 4 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2665 रुपयांवर बंद झाले. एखाद्या व्यक्तीने 15 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 11.57 लाख रुपये झाले असते.
कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 874.80 रुपये आहे. त्याच वेळी, शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,050 रुपये आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने मार्च 2022 च्या तिमाहीत 121 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 16 टक्क्यांनी अधिक आहे.
मार्च 2021 च्या तिमाहीत कंपनीला 104 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 1,587 रुपये कोटी झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,082 रुपये कोटी होते. दरम्यान, एनर्जीची विक्री आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक 72 टक्क्यांनी वाढून 9,426 दशलक्ष युनिट्सवर गेली.