इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर बाजारांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहे, परंतु काही शेअर्स चे भाव वाढल्याने त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे मिंडा कॉर्पोरेशन या कंपनीच्या ऑटो स्टॉकने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या समभागाने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना 5000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
या कंपनीचे शेअर्स 4.5 रुपयांवरून 270 रुपयांपर्यंत वाढले आहेत. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीचे शेअर्स लवकरच 315 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. मिंडा कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मिंडा कॉर्पोरेशनच्या समभागांनी निफ्टी ऑटो इंडेक्सला मागे टाकले आहे. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते. मजबूत वाढीची शक्यता लक्षात घेऊन ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्सवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे. ICICI सिक्युरिटीजने कंपनीच्या शेअर्ससाठी 315 रुपये टार्गेट किंमत दिली आहे. एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 181 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मिंडा कॉर्पोरेशनचे शेअर्स 13 जून 2012 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 4.50 रुपयांच्या पातळीवर होते. 22 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर रु. 270 वर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 5,000 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 13 जून 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 60 लाख रुपयांच्या जवळपास गेली असती. कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 93.90 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची उच्च पातळी 287 रुपये आहे.