मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल या आशेने अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. हजारो गुंतवणूकदार चांगला परतावा कमवण्याची संधी शोधत असतात. गुंतवणूक केली आणि तुम्ही मालामाल झाले असे होत नाही. त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागतो. शेअर बाजारातील दिग्गजांच्या मते, फक्त शेअर खरेदी करणे आणि विक्री करण्यातून पैसे कमावले जात नाहीत, तर संयम ठेवल्यानेही पैसे कमावता येतात.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक म्हण प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, खरेदी करा, होल्ड करा आणि विसरून जा…गुजरातमधील ज्योती रेजिन अँड अॅडहेसिव्ह लिमिटेड कंपनी याचे जिवंत उदाहरण आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीच्या एका शेअरने १८ वर्षांत जवळपास ४,५४,९०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
एकेकाळी ३६ पैसे किंमत
ज्योती रेजिन अँड अॅडहेसिव्ह लिमिटेड कंपनीचे शेअर ३० एप्रिल २००४ मध्ये मुंबई शेअर बाजारात ३६ पैसे प्रति शेअरच्या पातळीवर होते. आता कंपनीचे शेअर १,६३८.५५ रुपयांवर (११ मार्च २०२२ रोजी बीएसईचा बंद भाव) पोहोचले आहेत. या दीर्घकाळात शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना ४,५४,९०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर गेल्या दहा वर्षांत कंपनीचे शेअर ९.३२ रुपये (१६ मार्च २०१२, बीएसईवर बंद भाव) ने वाढून १,६३८.५५ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच दहा वर्षात या शेअरने जवळपास १,७४७५.११ टक्के परतावा दिला आहे.
पाच वर्षांत एवढा परतावा
गेल्या पाच वर्षांत हा शेअर ६९ रुपये (१८ डिसेंबर २०१७ चे भाव) ने वाढून १,६३८.५५ रुपये इतका झाला आहे. या काळात शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना २२७३.९१ टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी १५ मार्च २०२१ रोजी या शेअरची किंमत बीएसईवर ४८०.१० रुपये होती. म्हणजेच एका वर्षात कंपनीच्या शेअर्सची २४१.२९ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षी २०२२ मध्ये हा शेअर ४६.३८ टक्क्यांवर आहे.
कोट्यवधींचा नफा
कंपनीचे शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, जर कोणत्याही गुंतवणूकदाराने १८ वर्षांपूर्वी ३६ पैसे प्रति शेअरच्या हिशेबानुसार १० हजार रुपये लावले असतील आणि आतापर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज ही रक्कम ४.५५ कोटी रुपये झाली असती. दहा वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने ९.३२ रुपये हिशेबानुसार १० हजार रुपये लावले असते, तर आज ही रक्कम १७.५८ लाख रुपये झाली असती. पाच वर्षांत १० हजार रुपायांची गुंतवणूक २.३७ लाख रुपये झाली असती. वर्षभरात १० हजार रुपयांची गुंतवणूक ३४.१२ हजार रुपये झाली असती.
कंपनीचा इतिहास
ज्योती रेजिन्स अँड अॅडहेसिव्ह लिमिडेट या कंपनीची स्थापना १७ डिसेंबर १९९३ रोजी झाली होती. कंपनीने २२ फेब्रुवारी १९९४ रोजी व्यवसाय सुरू केला होता. या कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनीच्या रूपात वर्गीकरण करण्यात आले आहे. ही कंपनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये आहे. जगदीश पटेल हे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी रेजिन आणि अॅडहेसिव्ह बनवते. कंपनीचे बाजार भांडवल ६५५.४२ कोटी रुपये आहे. कंपनीचे शेअर्स २८ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या ५२ आठवड्याच्या सर्वोच्च पातळीवर १,८८९.०० रुपयांवर पोहोचले होते.
(महत्त्वाचे- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)