मुंबई – ‘मालामाल विकली’ हा थोडासा कॉमेडी चित्रपट अनेकांना भावतो, याचे कारण म्हणजे या चित्रपटात एका व्यक्तीला १ कोटीचे लॉटरीचे तिकीट लागते, परंतु त्याचा फायदा गावातील अनेकांना होतो, लॉटरी म्हणजे एक प्रकारे जुगारच होय, त्यात एखाद्याचे नशीब उजळते. त्याच प्रकारे शेअर बाजार देखील जुगारच मानला जातो. परंतु हा जुगार चांगल्या प्रकारे खेळल्यास त्यात नक्कीच यश मिळते, असे गुंतवणूक तज्ज्ञ म्हणतात.
मागील वर्षीच्या कोरोनाच्या संकटानंतर भारतीय शेअर बाजारासाठी यंदाचे वर्ष म्हणजे २०२१ हे खूप यशस्वी मानले जाते. कारण यंदा मोठ्या संख्येने लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये काही पेनी स्टॉकचा देखील समावेश असून पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे काहीसे धोक्याचे आहे, असे सांगितले जाते.
परंतु कंपनीचे तत्त्व आणि व्यवसाय मजबूत असेल तर हे स्टॉक चांगला परतावा देतात. असाच एक स्टॉक म्हणजे भारत रसायन कंपनीचा असून त्याने गुंतवणूकदारांना खूप श्रीमंत केले आहे. या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सने गेल्या वीस वर्षांत गुंतवणूकदारांना ४० हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी भारत रसायनाच्या स्टॉकमध्ये २५ हजार रुपये गुंतवले ते २० वर्षात करोडपती झाले आहेत.
दि. १२ नोव्हेंबर २००१ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर भारत रसायनचा शेअर २२ रुपयांवर बंद झाला. तर दि.१५ नोव्हेंबर २०२१ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर भारत रसायनाचा स्टॉक १०,१०० रुपयांवर बंद झाला.
त्यामुळे जर एखाद्या गुंतवणूकदाराने १२ नोव्हेंबर २००१ रोजी कंपनीच्या स्टॉकमध्ये २५ हजार रुपये गुंतवले असते, तर आजच्या तारखेला हे पैसे १ कोटी १४ लाख रुपये झाले असते.
दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तेव्हा म्हणजे १२ नोव्हेंबर २००१ रोजी भारत रसायनाच्या स्टॉकमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या ही रक्कम ४ कोटी ५० लाख रुपये झाली असती. भारत रसायनाच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १५,१३१.७० रुपये आहे. त्याच वेळी, गेल्या ५ वर्षांत, शेअरची किंमत ४२.६ टक्क्यांने वाढली आहे.







