मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजार म्हणजे एक प्रकारे जुगारच मानला जातो. यामध्ये गुंतवणूकदारांना कधी प्रचंड नफा होतो, तर कधी अत्यंत मोठा तोटा सहन करावा लागतो. सध्या शेअर बाजारांमध्ये खूप मोठे चढ-उतार होत आहेत. त्यातच आता इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. सोमवारी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्फोसिसचे शेअर्स सध्या 6.89 टक्क्यांच्या घसरणीसह 1628.10 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यानंतर आयटी कंपनी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे. दोन वर्षांहून अधिक काळातील इन्फोसिसच्या समभागांमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर बीएसईवरील इन्फोसिसचे बाजार भांडवल 6,92,281 कोटी रुपयांवर आले आहे. सुरुवातीच्या व्यापारातच गुंतवणूकदारांचे 40,000 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. निफ्टी आयटी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. निर्देशांक सुमारे 4 टक्क्यांनी घसरला आहे.
इन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ नोंदवून 5,686 कोटी रुपयांची नोंद केली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 5,076 कोटी रुपये होती. त्याच वेळी, कंपनीचा महसूल सुमारे 23 टक्क्यांनी वाढून 32,276 कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत 26,311 कोटी रुपये होता.
विशेष म्हणजे ICICI सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी सांगितले की, कमी वापर आणि क्लायंटच्या करारातील तरतुदींचा परिणाम यामुळे जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीची मार्जिन कामगिरी कमकुवत राहिली. गेल्या पाच दिवसांत इन्फोसिसचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
त्याच वेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या समभागांनी 14.33 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. कंपनीच्या समभागांनी गेल्या वर्षभरात सुमारे 20 टक्के परतावा दिला आहे. तर दुसरीकडे सुरुवातीपासून आतापर्यंत, इन्फोसिसच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांना सुमारे 14,000 टक्के इतका परतावा देण्यात आला आहे.