मुंबई – शेअर बाजार हा जुगार असल्याचे म्हटले जाते. काही वेळा अत्यंत कमी किमतीचा शेअर देखील ग्राहकाला लाखो रुपयांचा नफा मिळवून देऊ शकतो. अशाच एका शेअरने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देण्याचे काम केले आहे. हा शेअर रतन इंडिया एंटरप्रायझेसचा असून दि.1 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे समभाग 4.95 रुपयांच्या पातळीवर होते. तर आता 6 महिन्यानंतर दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजारात 46.60 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर कंपनीचे शेअर्स 46.25 रुपयांच्या पातळीवर होते.
गेल्या साडे सहा महिन्यांत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 950 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स 19.57 टक्क्यांनी वधारला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 1 एप्रिल 2021 रोजी रतन इंडिया एंटरप्रायजेसच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते पैसे आजच्या तारखेनुसार 9.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. म्हणजेच गुंतवणूकदाराने त्याच्या गुंतवणुकीवर 8.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला असता.
रतन इंडिया एंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 70.65 रुपये आहे. त्याच वेळी, या स्टॉकची 52-आठवड्यांची निम्न पातळी 4.48 रुपये आहे. दि. 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत चार प्रवर्तकांनी 74.75 टक्के भागभांडवल ठेवले. त्याच वेळी, कंपनीमध्ये सार्वजनिक भागिदारी 25.25 टक्के होती. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीची विक्री एक कोटी रुपये झाली, जी आधीच्या याच कालावधीत शून्य होती. परंतु गुंतवणूकदारांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाची गुंतवणूक वाढत्या किमतीनुसार आकर्षक वाटत असतात, परंतु ते उच्च जोखमीचे देखील असतात, त्यामुळे एखाद्या व्यक्तीने चांगले संशोधन केल्यानंतरच या समभागांमध्ये पैसे गुंतवावेत.