इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इचलकरंजीः शरद पवार यांची साताऱ्यातली भर पावसातली सभा त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातली जनता अजूनही विसरलेली नाही. त्याच सभेची आठवण आज इचलकरंजीकर यांना झाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार यांचे भाषण सुरू होताच पावसालाही सुरुवात झाली. पवार यांनी पावसातच आपले भाषण सुरू ठेवले. ते म्हणाले, की अनेकवेळा बोलायला उभा राहिलो, की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. यावर कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून घोषणा दिल्या.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे आहेत. कारंडे यांनी मतदारसंघ पिंजून काढत आवाडेपुढे आव्हान उभे केले आहे. आता प्रचाराच्या उत्तरार्धात पवार यांची पावसात सभा झाल्याने चुरस आणखी वाढणार आहे. पवार भाषणाला उभे राहतात पावसाला सुरुवात झाली, तरीरी त्यांनी आपले भाषण सुरू ठेवले. पवार म्हणाले, की सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करून सत्ताबदलाचे ऐतिहासिक काम तुम्हा सर्वांना करायचे आहे. भर पावसात तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हा लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी दाखवलीत, त्या तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. त्यांना भाजपच्या तिकीटावर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली. त्यांच्याविरोधात पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी भर पावसात सभा घेतली होती. या सभेनंतर साताऱ्यातली राजकीय गणिते बदलली. पवार यांची पावसातील सभा खूप गाजली. उदयराजे भोसले यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
……..