मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि धक्कातंत्र काही नवीन नाही. ते कधी कुठला राजकीय भूकंप करतील, याचा भरवसा नसतो. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी आणि त्यांची झालेली भेट पुन्हा एकदा असाच पॉवरफुल्ल भूकंप करणारी ठरलेली आहे. या भेटीने राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पवार आणि अदानी यांचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. ते कधीही लपून राहिलेले नाहीत. त्याबाबत पवारांनीदेखील फारसे टाळलेले नाही. काही दिवसांपूर्वीच दोघांची भेट झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच ही दुसरी भेट झाली आहे. अर्ध्या तासाच्या या भेटीत नेमक्या कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली, याबाबत माहिती नसली तरी या भेटीने राजकीय क्षेत्रात चर्चेला उत आला आहे.
पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझ्या सांगाती’मध्ये अदानी यांच्या उद्योगशीलतेचे कौतुक करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशीची मागणी करण्यात येत होती. मात्र, त्याच वेळी पवार यांनी अदानी यांच्याबाबत मवाळ भूमिका घेत जेपीसीकडून काही साध्य होणार नसल्याचे म्हटले होते. काँग्रेस आणि इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पवार यांनी आपल्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला होता.
सिंगापूरच्या शिष्टमंडळामुळे घडून आली भेट
शरद पवार यांच्याकडे सिंगापूरमधील एक शिष्टमंडळ आले होते. काही तांत्रिक मुद्यांवर त्यांना उद्योजक गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. गौतम अदानी आणि सिंगापूरच्या शिष्टमंडळ यांची भेट झाली. या तांत्रिक मुद्यांबाबत पवार अनभिज्ञ होते. त्यामुळे अदानी आणि सिंगापूरच्या शिष्टमंडळाच्या भेटीच्या वेळी पवार हे फक्त उपस्थित होते. त्यांनी चर्चेत सहभाग घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Sharad Pawar Gautam Adani Meet Politics