पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट गाजत आहे. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच पवारांच्या जवळच्या गटातील मानल्या जाणाऱ्या सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या प्रतिष्ठानावर आयटी विभागाने धाड टाकली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण आठ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. आता या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज आयकर विभागाकडून पुण्यात छापे टाकण्यात आले आहेत.
चौदा गाड्यांमधून आले अधिकारी
सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत त्यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. या कारवाईसाठी चौदा गाड्यांमधून अधिकारी आल्याची माहिती आहे. यावरून ही कारवाई मोठ्या स्वरूपाची मानली जात आहे.
सर्व राजकीय पक्षांशी संबंध
अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे प्रस्थ असून त्यांचे सर्व राजकीय पक्षांची जवळचे संबंध आहेत. त्यातल्या त्या ते शरद पवारांच्या निकटच्या व्यक्तींमध्ये आहेत. त्यांची कंपनी सिटी ग्रुप ही पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी या ग्रुपची स्थापना केली असून ते या समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आहे. त्यांनी पुण्यात अनेक व्यावसायिक आणि रहिवासी प्रकल्प साकारले आहेत.
Sharad Pawar Close Associate Pune IT Raid
Aniruddha Deshpande