इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी, आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे ह्या मागणीसाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाने जाहीर पाठिंबा देत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊयात असे आवाहन केले आहे.
ठाकरे बंधु या मोर्चाचे नेतृत्व करणार असून त्याला पवारांनी साथ दिली आहे. पाठींबा दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राच समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविध आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’ साठी हट्ट धरून बसलं आहे.
खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं कि, कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, व्ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी.
तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा असे पत्रात म्हटले आहे.
