इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलण्याची एकहाती ताकद असलेल्या शरद पवार यांच्या सभांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला; परंतु नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या शरद पवार यांच्या सभांमधील ही गर्दी मतांमध्ये परावर्तित होणार का, हा खरा सवाल आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवार यांनी आपले लक्ष विदर्भ, खानदेश आणि नंतर मराठवाड्यावर केंद्रित केले होते. या विभागातील सभा पार पडल्यानंतर पवार यांनी त्यांचा मोर्चा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात वळवला. पवार यांच्या सभा पश्चिम महाराष्ट्रात होताच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी वातावरणनिर्मिती होण्यास सुरुवात झाली. पवार यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीतून त्यांच्या सभांना मोठी गर्दी उसळत होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात झालेल्या पवार यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद हा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पवारांची जादू चालणार का, याचीच चर्चा आता होत आहे. पवार यांच्यासाठी ही लढाई तितकीशी सोपी नाही. कारण विधानसभा निवडणुकीतील मुद्दे हे लोकसभा निवडणुकीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या चर्चेमुळे दलित समाज सरकारवर नाराज होता. सत्ताधारी पक्षांतील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अल्पसंख्यांक समाजामध्ये अस्वस्थता होती. मनोज जरांगे फॅक्टरला धार होती आणि कांद्यासह इतर पिकांच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर सत्ताधारी महायुतीने यातील बहुतांशी मुद्द्यांवर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यंदाची निवडणूक स्थानिक समीकरणांवर लढली गेली. राज्यातील अनेक मातब्बर नेतेमंडळी आणि आमदार महायुतीच्या बाजूने असल्याने महाविकास आघाडीसमोरील आव्हान खडतर आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवार यांच्या सभांना होत असलेली गर्दी आणि दुसरीकडे महायुतीच्या मातब्बर आमदारांचे आव्हान, अशा स्थितीमुळे ही विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचे औत्सुक्य आहे.