इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
करमाळाः ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या टेंभुर्णीतील सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मलादेखील ‘ईडी’ची नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते; पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासद देखील नव्हतो, तरी मला नोटीस आली. मी ‘ईडी’च्या कार्यालयाच्या जवळ गेलो. त्यानंतर, अधिकारी आणि पोलिस प्रशासन म्हणले आमची चूक झाली. त्यांनी मला हात जोडल्याचे पवार म्हणाले.
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार होत होत असल्याचे निदर्शनास आणून ते म्हणाले, की महाराष्ट्रातील ६४ हजार महिला आणि लेकी पळवून नेल्या आहेत. स्त्रियांचे सरंक्षण करण्यात हे सरकार कमी पडले आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही. जे सरकार महिलांचे, मुलींचं रक्षण करु शकत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्य सरकारने लेक लाडकी योजना जाहीर केली, यातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले; पण दुसरीकडे राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असल्याचे पवार म्हणाले. या निवडणुकीत विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. याबाबात मी नारायण आबांना धैर्यशील मोहिते पाटलांना सोबत घेतो, अधिकाऱ्यांना बोलावतो आणि हे प्रश्न कसे सुटत नाही ते बघतो. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सत्तेचा वापर करू.
लोकसभेला मोठा कल जनतेने आमच्या बाजूने दिला; मात्र दिल्लीचे बहुमत मिळाले नाही;पण तुम्ही महाराष्ट्रातून निवडून दिलेले ३० खासदार प्रश्नांची सोडवणूक करतील, असे सांगून पवार म्हणाले, की करमाळ्यात नामदेवराव जगताप यांचा वारसा चालवण्याचे काम जयवंतराव जगताप करत आहेत. त्यांचे मी मनापासून अभार मानतो. ६२ लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पवार म्हणाले. मोदी यांनी उद्योगपतींचे १६००० कोटींचे कर्ज माफ केले; मात्र शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नसल्याची टीका त्यांनी केली.
माझ्या खासदारकीचा निधीसुद्धा माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना विश्वासावर खर्च करायचे अधिकार दिले होते; पण राज्यात सरकार बदलले, आपला पक्ष फुटला त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलाच नाही, अशी टीका त्यांनी केली. मी विचारले, तेव्हा ‘ईडी’ची भीती आहे असे सांगितले होते. संकट आल्यावर नंतर ज्याचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाची भीती नाही, असे पवार म्हणाले. गैरकारभार केल्यावर भीती वाटते असे त्यांनी सांगितले.