इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः जिहाद हा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात अल्पसंख्याकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे, हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केले, तर आम्हाला सवय आहे. असेच होते; पण याचा अर्थ ‘जिहाद’ होतो असे नाही, असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले.
पवार म्हणाले, की फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जिहाद’ हा शब्द वापरत निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना निवडणुकीत यश येणार नाही, हे लक्षात घेत त्यांनी हिंदू-मुस्लिम विषय घेऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मी कॉलेजला असल्यापासून अनेक पंतप्रधानांची भाषणे ऐकली आहेत. यात विकासाच्या मु्द्यावर उद्याचा देश कसा असावा, यावर ते भाष्य करत होते; पण नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, जे विकासाचा नाही, तर ४०० पारचा नारा देत आहे. हा ४०० पारचा नारा कशासाठी, असा सवाल ही त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे. सरकार चालवण्यासाठी जर २७२ खासदार लागातात, तर ४०० पारचा पारा कशासाठी हे जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने त्यांना रोखले, असे ते म्हणाले.
राज्यातील बेपत्ता महिला अन् मुलींचा आकडा पाहिला तर तो खूप मोठा असल्याचे दिसून येते. एका बाजूने लाडकी बहिण म्हणायचे अन् दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचार होत आहे, त्या बेपत्ता होत आहेत. त्यांचा पत्ता लागत नाही. आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मांडत आहोत, असे सांगून ते म्हणाले, की सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना हे सरकार काहीच करत नाही, यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. सध्या राज्यातली परिस्थिती पूर्णता गंभीर झालेली आहे. समाजात विध्वंसाचे वातावरण पेरण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. रोजगार नसल्यामुळे युवकांमध्ये नैराश्य वाढू लागले आहे.
लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही. कारण राज्यातील महिलांवर गेल्या दोन-तीन वर्षात अत्याचाराचे प्रमाण वाढू लागले आहे, हे सांगताना त्यांनी आकडेवारी सादर केली. मुलींवर व महिलांवर गेल्या दोन वर्षात ६७ हजार ३८१ अत्याचाराच्या घटना सरकारी आकडेवारीनुसार घडल्या आहेत. मुलींचे व महिलांची बेपत्ता होण्याची आकडेवारी आकडेवारी ६४ हजार आहे. यावरून महिलांना सुरक्षिततेची अधिक गरज आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी पाऊले टाकलेली आहेत आणि महाराष्ट्रातील जनता आमच्या बाजूने कौल देईल व महाविकास आघाडीच्या मागे उभे राहील, असा आत्मविश्वास पवार यांनी व्यक्त केला.