इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी घडलेल्या घडामोडीत बाबत अजित पवार यांनी हे भाष्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले का? प्रत्यक्षात तसे घडले का? असे प्रश्न शरद पवार यांनी विचारले आहेत. तसे घडलेले नसताना असे प्रश्न का काढायचे? असा सवाल त्यांनी केला. गौतम अदानीच नव्हे, तर सर्वंच उद्योजकांशी माझे चांगले संबंध आहेत, मी त्यांच्या घरी जात असतो, असे ते म्हणाले.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार मध्ये आणण्यासाठी अदानी यांच्या घरी बैठक झाली असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. या बैठकीला अमित शाह, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि मीदेखील उपस्थित होतो, असे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात एका वृत्त वाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांचे आरोप फेटाळले आहेत. त्याचबरोबर मी गौतम अदानीच नव्हे तर अनेक उद्योजकांच्या घरी जातो. रतन टाटा असो किंवा किर्लोस्कर अनेकांच्या घरी मी जात असतो, असे ते म्हणाले.
अदानी यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आणखी काही प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याचा अदानी यांचा विचार आहे. महाराष्ट्रात त्यांची गुंतवणूक जेव्हा झाली, त्यावे ळी मी मुख्यमंत्री होतो. गोंदिया, भंडारा परिसरात त्यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन मी केले होते. त्या भागात कोळशाच्या खाण विकसित करण्याचा त्यांचा विचार होता. त्यांना ते काम दिले गेले, त्या वेळी केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार नव्हते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, या गोष्टी राज्य म्हणून गरजेच्या असतात. त्यानुसार मी त्यांना भेटलो असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार जे सांगत आहेत त्यात सत्य नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. निवडणुकीचा कालावधी सोडला, तर केंद्रातील मंत्री असो, वा उद्योजक; या सर्वांना मी भेटत असतो. अनेक वेळा अजित पवार यांना सोबत घेऊन अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत. जेणेकरून त्यांना माहिती व्हावी, त्यांना कळवे, यासाठी मी असे करत होतो. शाह या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना एकदा नव्हे तर तीन-चार वेळा मी भेटलो. कधी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे शिष्टमंडळ घेऊनदेखील भेटलो. त्यांना त्यांच्या घरीदेखील जाऊन भेटलो. मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. त्यामुळे राज्याचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी मंत्र्यांची भेट घेणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे, हे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे आले होते. या वेळी पाय वर्षांपूर्वी गौतम अदाणी आणि अमित शाह यांनी मध्यस्थी केली होती का? याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारणा केली असता, त्यांनी अशी कोणतीही मध्यस्थी झाली नाही नसल्याचे सांगितले. त्यामुळे अजित पवारांनी २४ तासांच्या आत घुमजाव केले आहे.