राहुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. या वेळी त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक केले.
पवार यांची आज राहुरी येथे प्रचारसभा पार पडली. या वेळी पवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की पक्ष निर्माण करायला अक्कल लागते. फोडायला लागत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३०-४० आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होती. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होती. असे असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटले नाही.
फडणवीसांनी सगळ्यात मोठे काम काय केले, असे विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असा घणाघात त्यांनी केला. मागच्या वेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते; मात्र राज्यघटना धोक्यात असल्याने तुम्ही आमचे ३१ खासदार निवडून दिले. आता भाजप आणि आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. ठाकरे यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते; मात्र शिंदे यांनी काही लोक घेतले आणि गुवाहाटीला जाऊन बसले. ठाकरे यांचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? असा सवाल पवार यांनी केला.