इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः काहीही बोलणे हे राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हीच आमची भूमिका असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज विरुद्ध शरद पवार असे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आता काहीही बोलणार नसल्याचे म्हणत राज यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे.
शरद पवार हे जातीवादी असून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम जातीवाद केला असल्याचा आरोप राज यांनी केला होता. त्याला उत्तर देताना पवार यांनी मी जातीयवाद केल्याचे एकही तरी उदाहरण दाखवून द्या, असे आव्हान राज यांना दिले होते. पवार यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत राज यांनी एक उदाहरण दिले. पवार यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या डोक्यावरील पुणेरी पगडी काढून ही पगडी नको तर फुले यांची पगडी घाला, असे म्हणत जातीयवाद केला होता, असे राज म्हणाले होते.
पवार यांनी राज यांच्यावर त्यांनी आतापर्यंत काहीही केले नसल्याचे म्हटले होते. त्याला राज यांनी प्रत्युत्तर दिले. पवार यांना मी काय केले, याची एक पुस्तिकाच आता पाठवून देतो. वयाच्या मानाने त्यांना आता काही आठवत नसेल, असे म्हणत राज यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला होता. त्यामुळे आता या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप कोणते वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे.
राज यांच्या प्रत्युत्तरावर आता पवार यांनी अधिक बोलणे टाळले आहे. राज यांनी दिलेल्या उदाहरणावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली नाही. या संदर्भात प्रसार माध्यमांनी पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता राज हे कायम काहीही बोलत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची आता आमची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.