इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धाराशिवः शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता; मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असे निर्णय घेऊ शकणार नाहीत. कारण ते भाषण करण्यात हुशार आहेत; मात्र निर्णय घेण्यात नाहीत, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
पवार यांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आणि राज्यातील सत्ता बदलणार असल्याचा निर्धार केला. परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी पक्ष सोडलेल्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की काही लोकांनी आमची साथ सोडली. भाजपच्या पंक्तीत गेले. अगोदर सांगत होते विकासासाठी गेलो; पण आता भुजबळ नावाचे मंत्री सांगत आहेत की, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकले होते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. एक प्रकारे लाचारीचे दर्शन घडले आहे. महाराष्ट्र स्वाभीमानी आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे.
काहीही झाले, तरी पुन्हा यांच्या हातात सत्ता जावू द्यायची नाही. गेल्या नऊ महिन्यांत ९५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकरी का आत्महत्या करीत आहेत. केलेला खर्च निघत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो असे सांगून पवार यांनी एक किस्सा सांगितला. माझ्याकडे शेती खात्याचे काम होत, त्या वेळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मला कळली. मी तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांना सांगितले होते आणि सांत्वन करून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबाला भेटलो, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी रडत होती. म्हणाली कर्ज घेतले, पीक लावले. खर्च केला; पण पीक उद्ध्वस्त झाले. पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. दुसऱ्या वर्षी तीच परिस्थिती झाली. कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. तीच परिस्थिती सध्या आहे. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. या सरकार कडून सत्ता काढून घेतली पाहिजे, असे पवार म्हणाले.
ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. तुम्ही मला या वयातही फिरतो म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असा निर्धार पवार यांनी या वेळी केला.