औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शैक्षणिक, भौतिक, मानसिक पातळीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून जागतिक पातळीवर ते यशस्वी व्हावेत, आदर्श व जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी शिक्षण विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशपातळीवर पहिल्यांदाच शाळा पूर्व तयारी अभियान होत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ औरंगाबादेतून होत असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सातारा परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियान मेळाव्याचे उद्घाटन मंत्री गायकवाड यांच्या हस्ते झाले. मंत्री गायकवाड म्हणाल्या, या वर्षीपासून शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा हा आगळावेगळा उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, भौतिक आणि मानसिक आदींसह सर्वांगीण विकासाबरोबरच विविध विषयांचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे. लहानपणीच पाया भक्कम झाल्याने जिल्हा परिषदेतील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत यशस्वी होईल. या अभियानामुळे पाल्यांमध्ये जिज्ञासूवृत्ती वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. अशा उपक्रम वा अभियानाचे रुपांतर लोकचळवळीत व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या अभियानाला लोक चळवळीत रूपांतरीत करण्यासाठी ग्रामस्थ, सरपंचांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केली.
मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या दुरूस्तीसाठी 107 कोटींपैकी 92 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. आदर्श शाळा या संकल्पनेंतर्गत राज्यातील 488 शाळांना मागीलवर्षी 54 कोटी तर यावर्षी 300 कोटी रुपये देणार असल्याचेही मंत्री गायकवाड म्हणाल्या. कार्यक्रमामध्ये आमदार बंब यांनी मराठवाड्यातील शिक्षणाचा दर उंचावण्यासाठी आवश्यक सूचना केल्या. तर आमदार काळे यांनी शिक्षकांनी कोविड काळात शिक्षण उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. श्रीमती बेलसरे, श्री. गरड, श्री.पगारे यांनीही यावेळी विचार मांडले.
सुरूवातीला लहान पाल्यांच्या पायांचे ठसे घेऊन ‘पहिले पाऊल : शाळा पूर्व तयारी अभियान मेळाव्याचा’ शुभारंभ झाला.
शाळा पूर्व तयारीसाठी लावलेल्या आठ स्टॉलवर मंत्री गायकवाड यांच्या समक्ष प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांची चाचपणी करण्यात आली. पहिल्या स्टॉलवर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दुसऱ्या स्टॉलवर विद्यार्थ्यांचे वजन व उंची मोजण्यात आली व त्याची नोंद घेण्यात आली. तिसऱ्या स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता तपासण्यात आल्या. पुस्तक डोक्यावर घेऊन चालणे पेन्सिल छिलने, दोरीवरच्या उड्या मारणे, चित्र रंगवणे इत्यादी कृती यात घेण्यात आल्या. चौथ्या स्टॉलवर विद्यार्थ्यांना रंग, आकार, प्राणी, पक्षी, फुले, फळे, भाज्या इत्यादींचे वर्गीकरण करणे या क्षमता अवगत आहेत की नाही याबद्दल तपासणी करण्यात आली.
पाचव्या स्टॉल वर विद्यार्थ्यांना कुटुंब व समाज यांच्यासोबत सह-संबंध कशा प्रकारे विकसित होऊ शकतात या संदर्भात चाचपणी करण्यात आली. सामाजिक संकेतांचे ज्ञान किती प्रमाणात मिळाले आहे हे देखील पाहण्यात आले. सहाव्या स्टॉलवर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापूर्वी प्राप्त झालेल्या भाषिक ज्ञानाची तपासणी करण्यात आली. यामध्ये शब्दचित्र कार्डांचे वाचन, अक्षर ओळख, अक्षर लेखन इत्यादी क्षमता तपासण्यात आल्या. सातव्या स्टॉलवर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी गणन पूर्व क्षेत्रातील कोण कोणत्या क्षमता प्राप्त आहेत, याची तपासणी करण्यात आली. यात लांब आखूड, उंच ठेंगणा,जवळ दूर,मागेपुढे, डावा उजवा, वर खाली, अंक ओळख वस्तू मोजणे इत्यादी कृती घेण्यात आल्या. तर शेवटच्या आठव्या स्टॉलवर पालकांना कृतीपत्रिका सोडवून घेणे. पाल्यांच्या शिकण्यात पालक कशा पद्धतीने मदत करू शकतात, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. जून मध्ये होणाऱ्या दुसऱ्या मेळाव्यामध्ये पाल्यांची कोणत्या पातळीपर्यंत तयारी करून घेणे अपेक्षित आहे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंचावर आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, माजी आमदार डॉ.कल्याण काळे, माध्यमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंद्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, विभागीय उपसंचालक अनिल साबळे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक नेहा बेलसरे, विकास गरड, सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, एम.के. देशमुख आदींसह विभागातील शिक्षण विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.