मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने एका क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज पार्टीचा भांडाफोड केला. या रेव्ह पार्टीमध्ये सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानचे नाव आल्यानंतर बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ उडाली. एनसीबीने आर्यनची चौकशी करून त्याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. ड्रग्ज लपविण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. वेगवेगळ्या ठिकाणांवरून ड्रग्ज जप्त करण्यात आले, असा खुलासा एनसीबीच्या चौकशीत झाला आहे. एनसीबीच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
लेन्स बॉक्समध्ये
आर्यन खानच्या डोळ्याच्या लेन्सच्या बॉक्समध्ये ड्रग्ज लपविण्यात आले होते. त्याशिवाय पार्टीमध्ये सॅनेटरी नॅपकिन पॅडमधूनसुद्धा ड्रग्ज आणण्यात आले होते. इंडिया टुडेला एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानने आपल्या लेन्स बॉक्समध्ये ड्रग्ज ठेवले होते. परंतु आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते, असा दावा आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. तो पाहुणा म्हणून गेला होता. त्याच्याकडे बोर्डिंग पासही नव्हता. केबिनचा तसेच सीटचा नंबरही देण्यात आला नव्हता. त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली परंतु त्यात काहीच आढळले नाही, असे त्यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप चॅट
आर्यन खानवर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याच्या फोनच्या व्हॉट्सअॅपच्या चॅटमधून महत्त्वाचा खुलासा झाला आहे. तसेच मेमोमधील माहितीनुसार, आरोपीकडे १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या आढळल्या आहेत. या सर्वांची किंमत १,३३,००० रुपये सांगितली जात आहे.