चित्रकूट (उत्तर प्रदेश) – बॉलिवूड स्टार शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण यांच्या नावावर बोली लागत असल्याचे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का, पण हे खरे आहे. हो. आज आपण अशी माहिती जाणून घेणार आहोत जी तुम्हाला अत्यंत नाविन्यपूर्ण माहिती देणारी असेल.
मुघल शासक औरंगजेबने सुरू केलेला गाढवांचा बाजार आजही चित्रकुटमधील वैशिष्ट्य ठरत आहे. दीपावलीनिमित्त पाच दिवसांच्या या बाजाराला मंदाकिनी नदीच्या किनार्यावर सुरुवात झाली आहे. एका अंदाजानुसार या बाजारात दरवर्षी दहा हजार गाढवांची विक्री होते. या वर्षी जवळपास दोन कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमधील कलाकारांच्या नावाने विक्री होणार्या सलमान, शाहरूख आणि दीपिका या गाढवांवर ग्राहकांचे विशेष लक्ष असते. गाढवांच्या खरेदी-विक्रीसाठी ग्राहक आणि विक्रेते उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, उत्तराखंड, नेपाळ आदी भागातून येतात. बाजारात गाढवांवर बोली लावली जाते.
गाढवांच्या बाजाराचा इतिहास
चित्रकूटमध्ये मुघल शासक औरंगजेबने गाढवांचा बाजार भरविण्यास सुरुवात केली होती. त्या काळात घोड्यांचा तुटवडा भासल्याने औरंगजेबच्या सैन्य दलाने गाढवांचा बाजार भरविला होता. त्यामध्ये गाढवांसह खच्चरांची खरेदी करून त्यांचा सैन्यांमध्ये समावेश केला होता. या बाजारात अफगाणिस्तानमध्ये चांगल्या जातीचे खेचर आणण्यात आले होते. तेव्हापासून या बाजाराची परंपरा सुरू झाली आहे.
स्टार्सच्या नावाने बोली
बॉलिवूड स्टार्सच्या नावाने विक्री होणार्या गाढवांना या बाजारात अधिक मागणी असते. चांगल्या जातीच्या गाढवांची शाहरूख, सलमान, करिश्मा, दीपिका, रणवीर अशी नावे ठेवली जातात. या गाढवांची मागेल ती किंमत मिळते. आतापर्यंत तीन दिवसात सलमानवर सर्वाधिक दीड लाखांची बोली लागली आहे. शाहरूखवर फक्त ७० हजारांची बोली लागली. दीपिका नावाच्या गाढवावर सव्वा लाख रुपयांची बोली लागली. ऋत्विक रोशन आणि रणवीर सिंग प्रत्येकी ३० हजार आणि ५० हजारांत विक्री झाले आहे. बदामी आणि बाजरी खच्चर यांनाही चांगली मागणी असते. चित्रपट कलाकारांच्या नावावर त्यांची एक ते दीड लाख रुपयांपर्यंत विक्री झाली आहे. खच्चरांनाही दरवर्षी मोठी मागणी असते.