इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जग आधुनिकतेकडे झुकले आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्रबळ झाला आहे. एका बाजूला या सोशल मीडियाचा बॉलीवूडला प्रसिद्धीसाठी उपयोग होत असला तरी दुसऱ्या बाजूला नेटकऱ्यांनी एखादा मुद्दा उपस्थित केला की चित्रपटाची निगेटिव्ह प्रसिद्धी होते. अशीच काहीशी स्थिती शाहरुखच्या आगामी चित्रपटाबाबत आहे. शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमातलं गाणं सध्या वादाचा विषय बनला आहे. या गाण्यातील दृश्यं, गाण्याचे दोन शब्द आणि दीपिका पदुकोणने घातलेल्या केशरी रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे. या गाण्यावर थेट हिंदू महासभेनं आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेच्या स्वामी चक्रपाणी महाराजांच्या मते ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान झाल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
‘पठाण’ चित्रपटावर देखील बॉयकॉटचे संकट घोंघावते आहे. सोशल मीडियामध्ये काही नेटकरी यांनी आमीर खानच्या लालसिंग चड्डाप्रमाणेच शाहरुख खानचा पठाण सिनेमाविरोधातही बॉयकॉट मोहिम चालवण्याचा इशारा दिला आहे. या चित्रपटातील गाण्यात दिपीका पदुकोणने केशरी रंगाचीच बिकीनी का घातली, आणि गाण्याचे शब्द ‘बेशरम रंग’ असे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. या मुद्द्यांवरून या गाण्यावर आणि पर्यायाने चित्रपटावर जोरदार टीका होत आहे. हे गाणे हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डानं हे गाणे स्वीकारु नये, असे काही युझर्सचे मत आहे. तर दुसरीकडे कुस्तीत अनेक पैलवान केशरी रंगाचंच लंगोट परिधान करतात. तेव्हा भावना दुखावत नाहीत का? असा सवालही काही नेटकऱ्यानी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशातील भाजप सरकारनेही या वादात उडी घेतली आहे. जर आक्षेपार्ह दृश्यं मागे घेतली नाहीत, तर मध्य प्रदेशात सिनेमा प्रदर्शित न होऊ देण्याचा इशारा मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे. २६ जानेवारीला शाहरुख खानचा पठाण सिनेमा प्रदर्शित होतो आहे. जवळपास ४ वर्षानंतर शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. ज्याप्रकारे ‘लालसिंग चड्डा’ सिनेमाला बॉयकॉट मोहिमेचा फटका बसला, तसाच प्रकार पठाण सिनेमाबाबत घडतो का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
https://twitter.com/iamsrk/status/1602173942654910464?s=20&t=gWCFdo_uhgHAGdYqNDjg1Q
Shahrukh Khan Deepika Padukon Movie Pathan Controversy
Entertainment Bollywood Film Saffron Bikini