नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय ग्राहक पंचायत नाशिक शहर- जिल्हा शाखेच्या माध्यमातून नाशिक शहरातील गणेश भक्तांसाठी पेण येथील कलाकारांनी बनवलेल्या शाडू मातीतील सुबक श्रींच्या मुर्त्या ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदर उपक्रम केवळ ग्राहक संघाच्या सदस्यांसाठी असून नव्याने सदस्यांची नोंद करून घेण्यात येणार आहे. बारा आणि अठरा इंच उंचीच्याच घरात बसविण्यासाठी मूर्ती उपलब्ध असून सार्वजनिक गणेश मंडळांसाठी हा उपक्रम लागू नाही. सदर बुकिंग ऑनलाईन स्वरूपात लिंक द्वारे सुरू राहणार आहे. यासाठी ग्राहक पंचायतीचा ई मेल abgpnashik@gmail. com अथवा मोबाईल क्रमांक 9860798999 वर व्हॉट्स अप मेसेजद्वारे मागणी करावी असे आवाहन ग्राहक पंचायती चे सचिव किरण जाधव यांनी केले आहे.
सदर उपक्रम ही संघटनेची व्यावसायिक कृती नाही. ग्राहकांनी, ग्राहकांसाठी, ग्राहकांचे शोषण होऊ नये यासाठी चालवलेली ही चळवळ आहे. ज्येष्ठ दिवंगत नेते बिंदूमाधव जोशीजी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची ग्राहक संघ ही संकल्पना ग्राहकांचे आर्थिक शोषण कमी व्हावे या उद्देशाने सुरू केली होती. ग्राहकांचे प्रबोधन, ग्राहकांचे हक्क इत्यादी बाबत आज समाजात काही प्रमाणात जागृती झालेली आहे. नाशिक शहर जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतमार्फत यापूर्वी संपन्न झालेला तांदूळ महोत्सव या उपक्रमाशी बहुतांश नाशिककर परिचित आहेतच.
पुण्यातील (सदाशिव पेठ) ग्राहक पेठ ही याच ग्राहक संघ उपक्रमाचे एक मोठे रूप असून नाशिक शहर जिल्हामध्ये ग्राहकांचे संघटन उभे करण्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ठरविले आहे. श्रींच्या मूर्ती रास्त भावात देऊन या उपक्रमाचे लोकार्पण होणार आहे. मागील वर्षी हाच प्रयोग छोटेखानी स्वरूपात यशस्वीपणे संपन्न झालेला आहे. यंदा बुकिंग नंतर गणेश मूर्ती पुढील ठिकाणी उपलब्ध होतील. अश्विन नगर, सनशाईन प्ले स्कुल, खुटवड नगर, नाशिकरोड, पंचवटी.
नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात ग्राहकांना समर्पित भावनेने मोफत सेवा मार्गदर्शन सल्ला देणे, ग्राहकांमध्ये शासकीय नियमाबाबत जनजागृती करणे, ग्राहक संघामार्फत दैनंदिन वापराच्या वस्तू एकत्र खरेदी करून त्या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर वितरित करणे इत्यादी उपक्रम ग्राहक पंचायती च्या ग्राहक संघ उपक्रमातून चालविणे नियोजित आहे. त्या उद्देशाने संघटनेसाठी- सामाजिक कामासाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी तयार करण्याचे कामही सुरू आहे. कार्यकर्त्यांनी समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देण्याची विनंती ग्राहक पंचायतीच्या स्थानिक शाखेने केली आहे.
मूर्ती ऑनलाईन बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://cardioncorrect.org/
Shadu Ganesh Idol No Profit No Loss Available
Nashik Ganeshotsav Festival