पिंजोर गार्डन (हरियाणा)
नमस्कार, आपल्या या हटके पर्यटन स्थळांच्या माहितीपर मालिकेत आपण आज हरियाणातील एका मुगल गार्डनला भेट देणार आहोत…. पिंजोर गार्डन हे हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात पिंजोर शहरात १७ व्या शतकात बनविण्यात आले आहे. हे सुंदर गार्डन कोसल्या आणि झज्जर नद्यांच्या जवळ सुमारे १०० एकर जागेत आहे. १७ व्या शतकात बादशहा औरंगजेबचा चुलत भाऊ फिदाई खान याने हे गार्डन बनवले. हे एक टेरेस गार्डन आहे. कारण यात सात मजले आहेत. हे गार्डन मुगल शैली व राजस्थानी शैलीत बनवले आहे.
गार्डनचे प्रवेशद्वार एका टेकडीवर आहे. त्यानंतर खाली खाली उतरत जावे लागते. प्रत्येक मजल्यावर सुंदर नक्षीकाम केलेल्या कमानी आहेत. या कमानींमधून पाण्याचे कृत्रिम झरे बनवले आहेत. या कमानींवर सायंकाळी विद्युत रोषणाई केली जाते, तेव्हा येथील नजारा लाजबाब असतो. पिंजोर गार्डन हे वास्तुकलेसाठीही ओळखले जाते. गार्डन परिसरात फिदाई खानाने आपल्या राण्यांसाठी शिशमहल व हवा महल हे दोन महल बांधले आहेत.
हे गार्डन फिदाई खान याने साकारले असले तरी नंतरच्या काळात या भागात गोईटर या आजाराची साथ आली. या उद्यानाची मालकी पतियाळाच्या राजाकडे आली. स्वातंत्र्यानंतर पतियाळाचे महाराजा यादवेंद्र सिंह यांनी (पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे वडील) सरकारकडे हस्तांतर केले. तेव्हापासून या उद्यानास पिंजोर गार्डन तसेच यादवेंद्र गार्डन असेही संबोधले जाते.
गार्डन परिसरात चिडीयाघर, नर्सरी, जपानी गार्डन आपण बघू शकतो. तसेच पर्यटक व स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी येथे वर्षभर खाद्य मेळा, आंबा महोत्सव, बैसाखी महोत्सव व विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. येथे कॅमल राईड, ग्लायडींग, हेरिटेज ट्रेन राईडही करता येते. चला तर मग, अशा या मुगलकालिन गार्डनला भेट द्यायला जायलाच हवे.
कसे पोहचाल
पिंजोर गार्डन हे चंदिगड शहरापासून फक्त २२ किलोमीटरवर आहे. चंदिगड येथे आपण विमान, रेल्वे तसेच रस्तेमार्ग पोहचू शकतो. अंबाला ते शिमला या प्रमुख मार्गावर पिंजोर गार्डन आहे.
केव्हा जाल
पिंजोर गार्डन हे वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते. मात्र, फेब्रुवारी ते एप्रिल आणि सप्टेंबर ते डिसेंबर या काळात येथील हवामान छान असते.
प्रवेश फी
रु. २०/- प्रत्येकी
कुठे रहाल
पिंजोर गार्डन भागात काही हाॅटेल्स आहेत. परंतु सर्व सोयींनी युक्त व सर्व दर्जाची हाॅटेल्स चंदिगड येथे उपलब्ध आहेत.
Seven Story Beautiful Garden Tourist Destination