इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या सात कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील इंदूर या शहरात ही घटना घडली. सर्व कर्मचाऱ्यांना एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, मात्र उपचार सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे जबाब घेता आले नाहीत. कंपनीचे दोन्ही मालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या परदेशीपुरा पोलीस स्टेशन हद्दीत अजमेरा वायर प्रोडक्ट्स ही कंपनी आहे. काम करत नसल्याचे सांगून गेल्या काही महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही. शिवाय काल (३१ ऑगस्ट) त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर सात कामगार आज सकाळी कारखान्यात पोहोचले आणि त्यांनी मालकांना भेटण्याचा आग्रह धरला. मालकांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याने त्यांनी कंपनीच्या गेटवर विषारी द्रव्य प्राशन केले.
जमनाधर विश्वकर्मा, दीपक सिंग, राजेश मेमोरिया, देवीलाल करेडिया, रवी करेडिया, जितेंद्र धामनिया आणि शेखर वर्मा अशी नोकरीवरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेनंतर कंपनीचे मालक रवी बाफना आणि पुनीत अजमेरा हे दोघेही पोलिसांना त्यांच्या कार्यालयात, घरी किंवा अन्य कोणत्याही ज्ञात ठिकाणी सापडले नाहीत.
या लोकांना काढून का टाकण्यात आले याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर कर्मचाऱ्यांची आणि कंपनीच्या व्यवस्थापनाची चौकशी केल्यानंतरच आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत काहीही सांगता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कंपनीचे अधिकारी आणि कुटुंबीयांनी रवी बाफना आणि पुनीत अजमेरा यांच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती असण्यास नकार दिला आहे. अटक टाळण्यासाठी हे दोघे अज्ञातस्थळी लपून बसल्याचे समजते.
दोन्ही मालकांनी आणखी दोन ठिकाणी कारखाने सुरू केल्याने त्यांनी येथे उत्पादन बंद केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आदेश दिल्यानंतरही येथे काम होत नव्हते. या कारणावरून अजमेरा वायरमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. याठिकाणी कर्मचार्यांवरही बराच काळ काम सोडून जाण्याचा दबाव निर्माण केला जात होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. निवेदनानंतर कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी मालकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.
Seven Employee Suicide at Company Gate
Crime Madhya Pradesh Indore