मुंबई – महाराष्ट्रात कोरोनारुग्णांच्या बाबतीत दिलासादायक वातावरण फार काळ टिकत नसल्याचे दिसत आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बैठकांचे सत्र सुरू असून, संभाव्य तिस-या लाटेला रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य सरकारने रविवारी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील सात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढलेली आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांचा समावेश आहे. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने रविवारी बैठक घेऊन पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही रुग्णसंख्यावाढ तिस-या लाटेला जबाबदार ठरू नये अशी सरकारची भीती आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले नाही. पण नव्या रुग्णांच्या संख्या किंचित वाढ झाली आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याच्या आरोग्य अधिका-यांनी ही माहिती दिली. आकडेवारीवरून असे लक्षात आले आहे की, गेल्या आठवड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक सकारात्मकता दर (पॉझिटिव्हीटी रेट) ५ टक्क्यांहून कमी झाला आहे. परंतु या आठवड्यात हा आकडा अनुक्रमे ६.५८ टक्के आणि ५.०८ टक्के राहिला आहे. सर्वाधिक रुग्ण आढळणार्या शहरांमध्ये आता मुंबईचाही समावेश झाला आहे.
राज्यात एकूण ५२,०२५ सक्रिय रुग्णांपैकी ९०.६२ टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांमधील आहेत. त्यामध्ये ३७,८९७ म्हणजेच ७२.८४ टक्के रुग्ण ५ जिल्ह्यातील आहेत. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना राज्य सरकारने चिंताग्रस्त जिल्हे असे संबोधले आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. व्यास सांगतात, या राज्यांमध्ये संसर्गाचा वृद्धी दर आणि साप्ताहिक सकारात्मकता दर खूपच जास्त आहे. गणेशोत्सव शुक्रवारपासून सुरू होत असून, याच राज्यांमध्ये उत्सवाचे प्रमाण अधिक असल्याने तिस-या लाटेला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून अत्याधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.