त्र्यंबकेश्वर ( प्रतिनिधी ) कोविड महासंकटानंतर उद्योग विश्वाला चालना मिळण्याच्या उद्देशाने सेवाह एज्युकेशन हब प्रा. लि. च्या वतीने बिझनेस कॉन्क्लेव आयोजित करण्यात येणार आहे. येत्या ३ एप्रिल रोजी गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्स येथे घेण्यात येणार्या या उपक्रमात विविध भागांतील तीनशेहून अधिक उद्योजक सहभागी होणार असल्याची माहिती संचालक अश्विनी धुप्पे आणि आशिष धारणे यांनी दिली.
सदर उपक्रम दिवसभर सुरू राहणार असून त्यामध्ये मान्यवरांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानासह उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी नामवंत उद्योजकांना निमंत्रित करण्यात येईल. साधारणत: चार बॅचेसमधील उद्योजक/व्यावसायिकांना आपापले व्यावसायिक सादरीकरण करण्याची संधी देण्यात येणार आहे. उभरत्या उद्योजकांना व्यवसाय अथवा लोगाचे अनावरण करण्याची संधी या उपक्रमात राहणार आहे. याप्रसंगी वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. आपले व्यावसायिक जाळे विस्तारित करण्याची संधी देणार्या या उपक्रमाला मान्यवर आणि यशस्वी व्याख्यात्यांच्या यशोगाथेची जोड मिळणार असल्याने नवगतांसाठी व्यावसायिक उभारणीची ही पर्वणी राहील, असा विश्वास चेअरमन अश्विनी धुप्पे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या उपक्रमातील सहभागासाठी 9372364699 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार
याप्रसंगी इएसडीएसचे पियुष सोमाणी हे व्यवसाय विस्तार आणि सांघिक व्यवस्थापन या विषयावर, नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे हे लहान जागेत कमी सुविधांसह व्यवसाय या विषयावर, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद हे जीवनातील अध्यात्माचे महत्व या विषयावर, सनदी लेखापाल प्रशांत पाठक आणि मकरंद महादेवकर हे करप्रणाली, शासकीय योजना आणि अनुदान या विषयांवर तर विन्जीत टेक्नोलॉजीचे अश्विन कंडोई तंत्रज्ञान व्यवसायातील संधी या विषयांवर मार्गदर्शन करतील.
सेवाह एज्युकेशन हब बाबत…
गेल्या तीन वर्षांपासून नाशिकमध्ये अस्तित्वात असलेल्या सेवाह एज्युकेशन हबच्या वतीने उद्योजक तथा व्यावसायिकांना सर्वसमावेशक आणि शास्त्रीय पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात येते. चेअरमन अश्विनी धुप्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ आणि अभ्यासू मार्गदर्शकांचा चमू नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात संस्थेचे प्रशस्त कार्यालय अस्तित्वात आहे.