विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कुठलीही लस तयार करताना गाय, घोडा, वासरू किंवा म्हशीच्या सीरमचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्राला ही बाब नवीन नाही. मात्र कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्सिनमध्ये वासराचे सीरम वापरल्याची माहिती अशा पद्धतीने पुढे आणली गेली की स्वतः वैद्यकीय क्षेत्राच्याही भुवया उंचावल्या आहेत. या मुद्यावरून आता देशात नवा वाद सुरू झाला आहे.
कसोली येथील सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक प्रा. राकेश सहगल म्हणतात की, ‘कोणतीही लस तयार करण्यासाठी पेशी उगवल्या जातात. त्याला वैद्यकीय भाषेत सेल्सलाईन म्हणतात. पेशी वाढविण्यासाठी सीरमची अर्थात रक्तातील पातळ द्रव्याची आवश्यकता असते आणि ते म्हैस, घोडा, गायीचे वासरू किंवा इतर काही प्राण्यांमधून घेतले जाऊ शकते.
पेशी वाढवून त्यांना संक्रमित करायचे असते तेव्हा असे सीरम आवश्यक असते ज्याचे आहारमुल्य जास्त आहे. या जनावरांमध्ये त्याची मात्रा नक्कीच जास्त असते आणि त्यामुळेच त्यांच्या सीरमचा वापर गेल्या कित्येक दशकांपासून सुरू आहे.’
पोलिओमध्ये दुसरे काय?
आयसीएमआरमधील एक ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणतात की पोलिओ आणि रेबीजच्या लसींमध्येही हेच सीरम वापरले जाते. आता गायीच्या वासराचे सीरम वापरल्यामुळे निर्माण झालेला वाद हा केवळ राजकीय खेळ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
‘कुठल्याही विषाणूचा नाश करण्यासाठी तयार होणाऱ्या लसींमध्ये जोपर्यंत आपण पेशी तयार करून त्यांच्यात संक्रमित विषाणू टाकत नाही आणि त्याचा प्रभाव बघत नाही तोपर्यंत लसीची निर्मिती होऊच शकत नाही,’ असेही त्यांनी सांगितले आहे.