विशेष प्रतिनिधी, पुणे
देशभरातून टीका आणि मोठी चर्चा झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारांसाठी दिल्या जाणाऱ्या लसीच्या किंमतीत बदल केला आहे. तशी घोषणा सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी केली आहे. राज्य सरकारांना आता ही लस ३०० रुपयात दिली जाईल, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे. जनता आणि देशाच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जानेवारीच्या मध्यापासून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणांना लस देण्याचे घोषित झाले आहे. या लसीकरणासाठी कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमती जाहीर केल्या आहेत. सीरमची कोविशिल्ड लस ही राज्य सरकारला ४०० रुपये दराने प्रति डोस तर खासगी रूग्णालयात ६०० रुपयांना देईल, अशी घोषणा केली होती. तर, भारत बायोटेकने कोवॅक्सीनचा प्रति डोस खासगी रुग्णालयांना १२०० रुपये आणि राज्य सरकारांना ६०० रुपयांना देण्याचे जाहिर केले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारला हा डोस १५० रुपयांना दिला जाणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या दरात फरक का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अखेर याची दखल घेत सिरमने राज्यांसाठीचा दर १०० रुपयांनी कमी केला आहे.
https://twitter.com/adarpoonawalla/status/1387379373452390409