मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या अत्यंत खडतर काळात जगाला कोव्हिशिल्ड व्हॅक्सीन पुरविणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट अॉफ इंडियाचे संचालक जवरेह पुनावाला चांगलेच अडचणीत आले आहेत. ईडीने त्यांच्या ४२ कोटी रुपयांच्या चार मालमत्ता जप्त केल्या असून चौकशी सुरू केली आहे.
कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेजवळील पनामा या देशात पैशाचा फेरफार करण्यासाठी जगभरातील अनेक उद्योगपतींसह सेलेब्रिटींनी बनावट कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांचा वापर बेहिशेबी पैसा लपवणे, कर चुकवणे अशा कारणांसाठी केला गेला. जगभरातील शोधपत्रकारांनी एकत्र येत पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची लाखो कागदपत्रे उजेडात आणली.
सात वर्षांपूर्वी उघड झालेल्या कागदपत्रांत जगातील अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर आली. ज्यामध्ये शेकडो भारतीयांचाही समावेश होता. यात जवरेह सोली पुनावाला यांचेही नाव आले आहे. त्यामुळे ईडीने त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी झवरेह सोली पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. त्यानंतर ४१.६४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
जवरेह सोली पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध फेमाच्या (परकीय चलन विनिमय कायदा) तरतुदींनुसार लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस)च्या गैरवापराच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या भारतातील मालमत्तांच्या समतुल्य मूल्याच्या फेमाच्या कलम ३७ ए च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आल्या आहेत. पूनावाला यांच्या मालकीच्या सीजे हाऊस वरळी (मुंबई) येथे असलेल्या तीन स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जवरेह सोली पुनावाला हे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक असून त्यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आले होते. तेव्हापासूनच या कारवाईचा अंदाज उद्योग क्षेत्रातील अनेकांना होता.
४२६ लोकांची चौकशी
सात वर्षांपूर्वी पनामामधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर भारतातील ज्या लोकांची नावे त्यात आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने मल्टी एजन्सी गृपची (एमएसजी) स्थापना केली. ज्याद्वारे उघड झालेल्या गैरव्यवहारातील ४२६ लोकांची चौकशी सुरू आहे. पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्यामुळेच पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते, हे विशेष.
बारा देशांचे प्रमुख
या प्रकरणात जगातील बारा देशांच्या प्रमुखांचीही नावे आली होती. तर त्याचवेळी जगातील १२८ दिग्गज राजकारण्यांचाही यामध्ये समावेश होता. विशेष म्हणजे तब्बल ११ दशलक्ष अर्थात एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज शोध पत्रकारांच्या हाती लागला होता.
Serum Director Poonawalla ED Seized 42 Crore Property