इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासारखे प्रकार वाढल्याने समाजात भिती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. नोकरीच्या मुलाखतीसाठी दिल्लीहून राजस्थानमधील चुरू येथे आलेल्या २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हॉटेलच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खिडकीतून फेकण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी मुलीला अनेक जखमा झाल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.
या भयानक घटनेबाबत माहिती देताना राजस्थान पोलिसांनी सांगितले की, ही घटना चुरू रेल्वे स्थानकाजवळ घडली. सदर पीडित तरुणी नवी दिल्लीहून आली असता चार आरोपींपैकी एकाने तिला नोकरीची ऑफर दिली. त्यानंतर ती तरुणी चुरूला गावात पोहोचली तेव्हा चौघांनी तिला गोड बोलून एका हॉटेलमध्ये नेले, तेथे देवेंद्र सिंग आणि विक्रम सिंग यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी आणखी सांगितले की, मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिचे हात दोरीने बांधले आणि हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीतून तिला फेकून दिले. सदर मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भवानी सिंग आणि सुनील राजपूत अशी अन्य दोन आरोपींची नावे आहेत. सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.