नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना संसर्गामुळे दिल्लीतील सरकारी रुग्णालयांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. राजधानीत ४० हून अधिक सरकारी रुग्णालये आहेत. त्यापैकी १७ रुग्णालयांमधील दोन हजारांहून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येत आरोग्य कर्मचार्यांचीही भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.
या रुग्णालयांमधून माहिती एकत्रित केल्यानंतर असे आढळले आहे की, दिल्लीत सध्या १२०० डॉक्टर, ७०० नर्स आणि ४०० पॅरामेडिकल स्टाफ कोरोनाबाधित झाला आहे. २३०० आरोग्य कर्मचार्यांना संसर्ग झाल्यानंतर ते आपापल्या घरात विलगीकरणात आहेत. एम्समधील ४३० आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामध्ये ८० हून अधिक विद्याशाखेतील आणि निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. ३५ आरोग्य कर्मचार्यांना मध्यम लक्षणे आढळत असल्याने त्यांना एम्सच्या न्यू प्रायव्हेट वार्डात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली आरोग्य अधिकार्यांच्या माहितीनुसार, राज्यस्तरावरील किती आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे याबद्दलची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु सरकारी, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असे मिळून मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी बाधित झाल्याचे आम्ही स्वीकारले आहे. नवी दिल्लीतील केंद्र सरकारच्या लेडी हॉर्डिंग मेडिकल कॉलेजमधील ४० टक्क्यांहून अधिक स्टाफ बाधित झाला आहे. येथील निवासी डॉक्टर विवेक सांगतात, त्यांच्या बॅचमधील २० निवासी डॉक्टर संक्रमित झाले आहेत. रुग्णालयाच्या बाहेर नव्हे तर रुग्णालय परिसरातच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. मनीष सांगतात, त्यांच्या रुग्णालयात जवळपास ३५ टक्के निवासी आणि विद्याशाखेतील डॉक्टर संक्रमित झाले आहेत. रुग्णालय व्यवस्थापनानुसार त्यांच्याकडे १६५ आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत. सफदरजंग रुग्णालयात आतापर्यंत २०० हून अधिक आरोग्य कर्मचारी संक्रमित झाले. बाधितांमध्ये ९५ डॉक्टर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय लोकनाय रुग्णालयातील ४५, जीटीबीमधील ८५, रोहिणी येथील आंबेडकर रुग्णालयातील ९२, हिंदूराव वैद्यकीय महाविद्यालयातील १३५, डॉ. हेडगेवारमधील ४०, चाचा नेहरू रुग्णालयातील ५२, राजीव गांधी सुपर स्पेशलिटीमधील ३५ आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत.
बसई दारापूर आणि दिलशाद गार्डन येथील ईएसआय रुग्णालयात ५० हून अधिक आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत. यामध्ये १६ डॉक्टरांचा समावेश आहे. दीप चंद बंधू रुग्णालयातील २२ आरोग्य कर्मचारी संक्रमित झाले आहेत. बुराडी रुग्णालयातील १२ आणि इंदिरा गांधी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात आतापर्यंत ४ बाधित आढळले आहेत. त्याशिवाय एम्सच्या झज्जर येथील कॅंपसमध्ये १०० हून अधिक आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.